रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: March 5, 2015 00:23 IST2015-03-05T00:23:36+5:302015-03-05T00:23:36+5:30
रिलायन्स कंपनीने येरवडा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे ९ किमी अंतराची ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आल्याने कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा,

रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करा
पुणे : रिलायन्स कंपनीने येरवडा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे ९ किमी अंतराची ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आल्याने कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिले आहेत. यापुर्वी खोदाईची कामे करताना रिलायन्स कंपनीकडून धमक्यांचे फोन आल्याचा तसेच पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.
शहरामध्ये रिलायन्स कंपनीकडून ४ जी लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेमध्ये १५० कोटी रूपये शुल्क भरून त्यांनी या खोदाईसाठी परवानगी घेतली आहे. खोदाई करूनच लाइन टाकणे बंधनकारक आहे. ओव्हरहेड वायर टाकण्यास पालिकेकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्यता देण्यात येत नाही. मात्र येरवडा परिसरात रिलायन्स कंपनीने ओव्हरहेड वायर टाकल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. त्यानंतर याप्रकरणी रिलायन्स कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यापुढे याप्रकरणाची सुनावणी झाली. दुसरे कोणीतरी रिलायन्स कंपनीच्या नावाने या ओव्हरहेड वायर टाकल्या आहेत, रिलायन्स कंपनीला त्रास देण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याचे म्हणणे कंपनीकडून मांडण्यात आले. येरवड्यात सापडलेल्या ओव्हरहेड वायरवर रिलायन्स कंपनीचे नाव व लोगो आढळून आला आहे. कोथरूडमध्ये परवानगी घेतलेल्या ठिकाणी रिलायन्स कंपनीकडून खोदाईचे काम केले जात होते. याविरूध्द जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना गुंडांकडून धमकीचे फोन करण्यात आले. तसेच पैशांचे आमिषही दाखविण्यात येते अशी तक्रार नगरसेवक प्रशांत बधे, पुष्पा कनोजिया, राहुल तुपेरे, माजी नगरसेवक उज्वल केसकर, मनसेचे उपशहराध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी अतिरिक्त नगरअभियंता विवेक खरवडकर यांच्याकडे केली होती. यामध्ये तथ्य आढळून आल्याने कंपनीला १६ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. (प्रतिनिधी)
रिलायन्स कंपनीने ९.३ किमी अंतरावर बेकायदेशीरपणे ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आला. त्यामुळे विद्युत विभागाच्या अधिका-यांनी येरवडा पोलिस स्थानकांमध्ये कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करावा असे सांगितले आहे.
- ओमप्रकाश बकोरिया,
अतिरिक्त आयुक्त