कर्मचाऱ्यांअभावी उपकेंद्र बंद
By Admin | Updated: October 27, 2015 00:47 IST2015-10-27T00:47:50+5:302015-10-27T00:47:50+5:30
वेल्हे तालुक्यातील उपकेंद्र कर्मचारी नसल्यामुळे बंदच आहेत. त्यामुळे तालुक्यातील उपकेंद्राची आरोग्यसेवा कोलमडली आहे.

कर्मचाऱ्यांअभावी उपकेंद्र बंद
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील उपकेंद्र कर्मचारी नसल्यामुळे बंदच आहेत. त्यामुळे तालुक्यातील उपकेंद्राची आरोग्यसेवा कोलमडली आहे.
वेल्हे तालुक्यात पासली, करंजावणे, पानशेत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामध्ये बारा उपकेंद्र आहेत. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण दररोज नियमित येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा चांगल्या प्रकारे मिळत आहे. उपकेंद्रातील कर्मचारी नसल्यामुळे उपकेंद्र बंद आहेत. तालुक्यातील आरोग्यसेवा देणाऱ्या उपकेंद्राबाबत माहिती घेतली असता, निम्म्यापेक्षा जास्त उपकेंद्रांत कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यात आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य विभाग असमर्थ ठरत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे जिल्हा परिषदेकडून वेल्हे तालुक्यात आरोग्यसेवा चांगली मिळावी या उद्देशाने उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम चांगले करण्यात आले आहे.
उपकेंद्राचे सर्व इमारतीचे बांधकाम दर्जेदार केले आहे. आधुनिक सोयीसुविधा आहेत. पण शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुणे जिल्हा परिषदेकडून मात्र वेल्हे तालुक्याकडे कायमच दुर्लक्ष होत आल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील प्रशासनात शासकीय कर्मचारी पदाच्या बाबतीत जिल्हा पातळीवर कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्याचा परिणाम म्हणून तालुक्यातील उपकेंद्रावर कर्मचारी संख्या नसल्याने उपकेंद्र बंदच आहेत. पाबे उपकेंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंदच असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांत या ठिकाणी आरोग्यसेवा मिळत नसल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
पाबे येथील उपकेंद्रावर हिरपोडी, पाबेमधील सात वाड्या अवलंबून आहेत, तर वांगणी येथील उपकेंद्रदेखील गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे वांगणी येथील ग्रामस्थांना करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. वांगणी, निगडे, बोरावळे, कोळवडी, कातवडी येथील ग्रामस्थ उपचारासाठी वांगणी येथील उपकेंद्रावर येत असतात. पण, हे उपकेंद्र बंद असल्याने लोकांना उपचार मिळत नाहीत. केवळ लसीकरणालाच तालुक्यातील उपकेंद्र उघडली जात आहेत.
विंझर येथील उपकेंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंदच आहे. तर तालुक्यात पाबे हे गाव लोकसंख्येने मोठे असल्याने आरोग्य सेवेसाठी उपकेंद्रावर येथील रुग्ण येत असतात. पण सेवा सुरळीत व नियमित मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
(वार्ताहर)