विद्यार्थी म्हणतात, न्यायालयात जाऊ
By Admin | Updated: July 10, 2015 01:57 IST2015-07-10T01:57:46+5:302015-07-10T01:57:46+5:30
संचालकांच्या निवड पॅनलवर पुन्हा सदस्यपदी चौहान यांचीच वर्णी लागल्याने स्टुडंट असोसिएशन अधिकच संतापले आहे.

विद्यार्थी म्हणतात, न्यायालयात जाऊ
पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसताना संचालकांच्या निवड पॅनलवर पुन्हा सदस्यपदी चौहान यांचीच वर्णी लागल्याने स्टुडंट असोसिएशन अधिकच संतापले आहे. आंदोलनाला जवळपास महिना होत आला, तरी केंद्रीय विज्ञान व प्रसारण मंत्रालयाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासनाबरोबर दुसरी बैठक करण्यास आम्ही तयार आहोत, तरीही या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्यास शासनाने केलेल्या सर्व नियुक्त्यांवर स्थगिती आणण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.
आंदोलनाचे शस्त्र विद्यार्थ्यांनी उगारले असले, तरी त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील मागण्यांवर शासनाने अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही; उलट हे आंदोलन दाबण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये आजपर्यंत केलेली ३९ आंदोलने, संस्थेचे खासगीकरण किंवा ती बंद करण्याच्या धमक्या शासनपातळीवर दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनचे प्रवक्ता राकेश शुक्ला आणि रणजित नायर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. १३ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत. ज्या व्यक्तींची निवड केली जाईल, त्यांनाही विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
> काँग्रेसच्या काळात निष्ठावान कार्यकर्त्यांना पेट्रोलपंपांचे वाटप किंवा प्रदेशाध्यक्षपद वगैरे दिले जात असे; पण सत्ताधारी सरकारने तर लघुपट किंवा प्रचार मोहिमेच्या चित्रफिती करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थेच्या अध्यक्षपदीच विराजमान केले आहे. शासन या नियुक्त्या विद्यार्थ्यांवर लादत आहे. या लोकांपेक्षा संस्थेमधील कर्मचाऱ्यांना नाटक आणि चित्रपटाविषयी अधिक जाण आहे. कुठल्या देशात किती आयुधे आहेत, याचे मोजमाप त्या देशातील कलासंस्कृतीमधून कळते. नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून देशाची प्रतिष्ठा असलेल्या एफटीआयआयच्या संस्थेवर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. सांस्कृतिक चळवळ मोडीत काढण्याचा हा प्रयत्न असल्याचे अभिनेते नंदू माधव यांनी सांगितले.
मुकेश खन्ना यांनी जनतेची माफी मागावी
चिल्ड्रन सोसायटी आॅफ इंडियाचे संचालक मुकेश खन्ना यांनी संस्थेवर कोणाची नियुक्ती करायची, हा अधिकार पूर्णत: शासनाचा आहे.विद्यार्थ्यांना तो मान्य नसेल, तर त्यांनी संस्था सोडून बाहेर पडावे, असे विधान केले. याबाबत संताप व्यक्त करून हे विधान लोकशाहीच्या विरोधात असून, हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे खन्ना यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी शुक्ला यांनी केली.
नियुक्तींचे निकष सांगा
शासनाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी कोणते निकष लावले आहेत, ते आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. हे आंदोलन आम्ही आमच्यासाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी करीत आहोत, असे शुक्ला म्हणाले.
रणबीर कपूरचा आंदोलनाला पाठिंबा
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादात अभिनेता रणबीर कपूरनेही उडी घेतली असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
‘विद्यार्थ्यांना ज्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल, अशा व्यक्तीची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, असे मत एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने प्रदर्शित केलेल्या ध्वनिचित्रफितीमध्ये रणबीरने मांडले आहे. एफटीआयआय ही चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, एडीटर तसेच पुरस्कारविजेती व्यक्तिमत्त्वे घडवणारी संस्था आहे.
या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आदराने पाहिले जाते. मात्र, काही दिवसांपासून संस्थेविषयी नकारात्मक गोष्टी ऐकू येत आहेत. या संस्थेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या पाहिजेत,’ असे रणबीरने म्हटले आहे.