विद्यार्थ्यांची ससेहोलपट
By Admin | Updated: October 15, 2015 00:48 IST2015-10-15T00:48:10+5:302015-10-15T00:48:10+5:30
अल्पावधीतच शिक्षणाचे माहेरघर बनलेल्या सोमेश्वरनगर या ठिकाणावरील बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बसप्रवासाबाबत ससेहोलपट होत आहे

विद्यार्थ्यांची ससेहोलपट
सोमेश्वरनगर : अल्पावधीतच शिक्षणाचे माहेरघर बनलेल्या सोमेश्वरनगर या ठिकाणावरील बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बसप्रवासाबाबत ससेहोलपट होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला बसेसची जादा गरज असतानाही या गोष्टींकडे डोळेझाक केली जात आहे.
बारामती आगाराने काही वर्षांपूर्वी नीरा-बारामती शटल बससेवा सुरू करून ‘हात दाखवा आणि बस थांबवा’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांची सोय झाली आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून सोमेश्वरनगर परिसरात महाविद्यालयांची संख्या वाढल्याने या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली.
रोज या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ५ ते ६ हजारांवर गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा भार बससेवेवर पडला. कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांना रोज तासन्तास बसची वाट बघावी लागत आहे.
बसमध्ये जागा कमी आणि विद्यार्थी जादा यामुळे पूर्ण विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना बसला लोंबकळतच जावे लागते. यामध्ये मुलींची जादा कुचंबणा होेते.