बसचालकाच्या मुजोरपणामुळे विद्यार्थ्यांची त्रेधा
By Admin | Updated: March 24, 2017 03:56 IST2017-03-24T03:56:29+5:302017-03-24T03:56:29+5:30
दहावीची परीक्षा सुरू असताना बारामती एसटी आगाराने मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी असहकार पुकारल्याचे दिसत आहे.

बसचालकाच्या मुजोरपणामुळे विद्यार्थ्यांची त्रेधा
सोमेश्वरनगर : दहावीची परीक्षा सुरू असताना बारामती एसटी आगाराने मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी असहकार पुकारल्याचे दिसत आहे. काही मुजोर बसचालक विद्यार्थ्यांनी हात दाखवूनदेखील बस थांबवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित चालकाची परिवहनमंत्री व विभाग नियंत्रक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
दि. ५ मार्च रोजी एसएससीचा हिंदी या विषयाचा पेपर होता. नीरा-बारामती मार्गावर पणदरेलगत खामगळवाडी या थांब्यावर सायली खामगळ ही दहावीची परीक्षार्थी विद्यार्थिनी उभी होती. तिने एसटी बसला हात दाखवून बस थांबवण्याची विनंती केली. मात्र राजेंद्र होळकर नामक मुजोर चालकाने बस थांबवली नाही. बसमधील प्रवासी हेमंत गडकरी यांनी वाहक शेख यांना आज दहावीचा पेपर आहे. चालकांना बस थांबवण्यास सांगा अशी विनंती केली. मात्र त्यांनीही बस थांबवली नाही. बस बारामती आगारात येताच गडकरी यांनी वाहक होळकर यांना बस न थांबवण्याबाबत विचारणा करताच होळकर यांनी गडकरी यांनाच दमदाटी करत शिवीगाळ केली व मारहाणीची धमकी दिली. गडकरी व परीक्षार्थी मुलीचे पालक विठ्ठल खामगळ यांनी याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते, विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापक सुभाष धुमाळ यांच्याकडे तक्रार केली असून, चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खोडद : हिवरेतर्फे नारायणगाव येथे बुधवारी सकाळी ९ वाजता एसटी बस न थांबल्यामुळे नारायणगाव येथे परीक्षेला जाणाऱ्या १०वीच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने व्यवस्था करून नारायणगाव येथे परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिला.
इयत्ता दहावीची परीक्षा सध्या सुरु आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील ४२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यांचे नारायणगाव हे परीक्षा केंद्र आहे. एसटी बसने विद्यार्थी नारायणगावला जातात. पहिला पेपर १०:३० वाजता सुरु होतो. बस खोडदहून हिवरेतर्फे नारायणगाव येथे ९ वाजता येते. १० वीच्या परीक्षेसाठी जाणारे सर्व विद्यार्थी या बसने ९:१५ वाजता नारायणगाव येथे पोहोचतात आणि परीक्षा केंद्रावर जातात.
रांजणी, वळती, मांजरवाडी, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, साळवाडी, नगदवाडी, ओझर, आर्वी, गुंजाळवाडी या परिसरातून हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करून नारायणगाव येथे यावे लागते. हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोरमळा येथेही काही दिवसांपासून ही एसटी बस थांबत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, खजिनदार रामदास शिंदे, संचालक अभिषेक खैरे, उपसरपंच सुधीर खोकराळे, राजेश भोर यांनी याबाबत नारायणगाव एसटी आगारप्रमुख टाकळकर यांना निवेदन दिले.