निमोणेत विद्यार्थ्यांना दाखले मिळेनात
By Admin | Updated: June 17, 2015 22:49 IST2015-06-17T22:49:30+5:302015-06-17T22:49:30+5:30
येथील श्री नागेश्वर विद्यालयामध्ये संस्थेने पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न केल्याने इ. १०वीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांना दाखले

निमोणेत विद्यार्थ्यांना दाखले मिळेनात
निमोणे : येथील श्री नागेश्वर विद्यालयामध्ये संस्थेने पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न केल्याने इ. १०वीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
निमोणे येथे पाषाण येथील श्री नेहरू शिक्षण संस्था संचालित श्री नागेश्वर विद्यालय आहे. अनेक वर्षांपासून संस्थेच्या अनियमित कारभारामुळे आणि ग्रामसंस्थांच्या वेळोवेळीच्या आंदोलनामुळे हे विद्यालय नेहमी चर्चेत राहिले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ग्रामस्थांनी वेळोवेळी उपोषणाचे अस्त्र वापरले होते. सेवाज्येष्ठतेनुसार पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न करणे, शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असणाऱ्या मागसवर्गीय शिक्षकांना अध्यापन सेवेपासून रोखणे, अनधिकृत शिक्षकांची नेमणूक करणे असे कितीतरी गंभीर आरोप ठेवून ग्रामस्थांनी आंदोलने केली आहेत. याशिवाय संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करणे या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. या विद्यालयामध्ये दोन वर्षांपासून पात्र मुख्याध्यापक नसल्याने शालेय प्रशासकीय कामकाजात नेहमी अनियमितपणा आलेला आहे. त्यामुळे सन १४-१५ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक निकालही विद्यार्थ्यांना मोठ्या विलंबाने मिळाला.
नुकताच इ. १०वीचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर इ. ११वी किंवा अन्य पुढील शिक्षणासाठी इ. १०वीचे शाळा सोडल्याचे दाखले त्वरित हवे असतात. मात्र, या विद्यालयामध्ये शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून नव्या मुख्याध्यापकांची नेमणूक केली असल्याने त्यांना सह्यांचे अधिकार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही दाखले मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अर्ज भरण्याची धावपळ चालू असताना निमोणे येथील विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी वर्ग हवालदिल झाला आहे. नवीन वर्गासाठी प्रवेशाचे अर्ज भरण्याची मुदत संपली, तर हे विद्यार्थी दाखल्याअभावी अर्ज भरू शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.