‘त्या’ विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली
By Admin | Updated: July 7, 2016 03:29 IST2016-07-07T03:29:24+5:302016-07-07T03:29:24+5:30
राजगुरुनगरजवळील चांडोली येथे सोमवारी स्कूल बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी शंभुराजे महेंद्र अरगडे (वय ९ वर्षे, रा. कडूस, ता. खेड) या विद्यार्थ्याची प्राणज्योत

‘त्या’ विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली
राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळील चांडोली येथे सोमवारी स्कूल बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी शंभुराजे महेंद्र अरगडे (वय ९ वर्षे, रा. कडूस, ता. खेड) या विद्यार्थ्याची प्राणज्योत अखेर बुधवारी मालवली. चिंचवड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने आर्याज स्कूल आणि कडूस गावावर शोककळा पसरली.
चांडोली येथे आर्याज स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर कडूसला जाणाऱ्या मुलांची बस रस्त्याच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाला घासल्यामुळे हा भीषण अपघात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला होता. बसच्या धडकेने कुंपणाचा वरचा लोखंडी रॉड, बसची काच फोडून आत घुसला. तो रॉड तसाच चालकाशेजारी बसलेल्या दोन मुलांच्या छाती-पोटातून आरपार जाऊन मुले गंभीर जखमी झाली होती. त्यांना चिंचवड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील रॉड काढले व पुढील उपचार सुरू केले होते. परंतु त्यापैकी शंभुराजे अरगडे याचा आज दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी दिली.
शंभुराजे इयत्ता चौथीत शिकत होता. त्याच्या मागे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी, की ज्या बसला अपघात झाला ती बस शंभुराजेच्या वडिलांच्या म्हणजे महेंद्र अरगडे यांच्याच मालकीची आहे.
अपघातग्रस्त बसचा चालक सचिन बबन बैलभरे याच्यावर भा. दं. वि. कलम ३३८ प्रमाणे दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच्यावर भा. दं. वि. कलम ३०४ (अ) प्रमाणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हाही दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी दिली. (वार्ताहर)