विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 01:33 PM2024-02-24T13:33:08+5:302024-02-24T13:33:27+5:30

मनविसेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर पायथा ते विद्यापीठ प्रवेशद्वार असा माेर्चा काढण्यात आला होता...

Students' demands should be met by the administration in 8 days, otherwise MNS style agitation- Amit Thackeray | विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच प्रलंबित मागण्या प्रशासनाने पुढील आठ दिवसांत साेडवाव्यात अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला.

मनविसेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर पायथा ते विद्यापीठ प्रवेशद्वार असा माेर्चा काढण्यात आला. या माेर्चाचे नेतृत्व ठाकरे यांनी केले. यावेळी शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे, संघटक प्रशांत कनोजिया, शहराध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, माेर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात आला हाेता. त्यामुळे काही वेळ चाैकात वाहतूककोंडी झाली होती.

ठाकरे म्हणाले, पुणे विद्यापीठाला ७५ वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही. तसेच राहण्यासाठी वसतिगृहे नाहीत. जगभरात नावलाैकिक असलेल्या विद्यापीठात पायाभूत सुविधा आणि पुरेशा शैक्षणिक सुविधा नाहीत. मराठी भवनाचे कामही दहा वर्षांपासून अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ साेयी-सुविधा देणे गरजेचे आहे. ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे यांची भेट घेत प्रश्नांवर चर्चा केली.

कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात मराठी भाषा भवनाचे काम पूर्ण करीत ते सुरू करणे, विद्यापीठ कॅम्पसमधे शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. विद्यार्थ्यांना राेजगार मिळावा यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू करीत रोजगार मेळाव्यांचे आयाेजन करणे, दहा हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसाठी नियाेजन करावे. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका लवकर द्यावेत. नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून, तेथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत तसेच दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Students' demands should be met by the administration in 8 days, otherwise MNS style agitation- Amit Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.