सावरदरीच्या शाळेत विद्यार्थ्यांची सहकारी बँक
By Admin | Updated: September 30, 2015 01:20 IST2015-09-30T01:20:28+5:302015-09-30T01:20:28+5:30
एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल, असा कायापालट खेड तालुक्यातील सावरदरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने घडवून आणला आहे.

सावरदरीच्या शाळेत विद्यार्थ्यांची सहकारी बँक
आंबेठाण : एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल, असा कायापालट खेड तालुक्यातील सावरदरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने घडवून आणला आहे. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी व पालकांची सहकारी बँक सुरू केली आहे़ शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे आता ‘आयएसओ’ मानांकनही प्राप्त झाला आहे.
सावरदरी गाव सध्या जरी वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जगाच्या नकाशावर असले, तरी काही वर्षांपूर्वी या गावात आपली मुलगी देण्यास बाहेरील गावचे लोक नकार देत. परंतु, बदलत्या काळाबरोबर आणि प्रखर कष्ट करण्याच्या मानसिकतेवर या गावातील लोकांनी भर दिला व आपले गावच नव्हे, तर शाळादेखील आदर्श बनविली.
या शाळेत ८५ मुले आणि ९४ मुली, असे एकूण १८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकतीच या शाळेची पाहणी करण्यात आली. आयएसओ मानांकनासाठी लावलेले सर्व निकष पूर्ण केल्याने सावरदरी शाळेची ‘आयएसओ ९००१:२००८’ साठी निवड करण्यात आली आहे. या शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये शाळेची इमारत, संपूर्ण फर्निचरयुक्त ई-लर्निंग व संगणक कक्ष, गांडूळखत प्रकल्प, परसबाग, कम्पोस्ट खत प्रकल्प असे नानाविध प्रकल्प या शाळेने राबविले आहेत.
कम्पोस्ट खत प्रकल्प राबवताना शाळेत दररोज जमा होणारा कचरा, मुलांचे उरणारे अन्न यांच्यापासून हे खत बनविले जात आहे. याशिवाय, शाळा परिसरात विविध औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. त्यात निलगिरी, आवळा, तुळस, बेहडा, हिरडा, फणस या झाडांची लागवड केली असून, त्यांना नाव असणारे फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पक्षी चारा प्रकल्प राबविण्यात आले असून त्यासाठी अन्नपाण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या राहण्यासाठी सुगरणीचे खोपे, घरटी उभारण्यात आली आहेत. याशिवाय भित्तिचित्रे, नकाशे, प्रत्येक वर्गानुसार अभ्यासक्रमाची मांडणी, ऋतुचक्र, सुविचार, भूजलचक्र चित्रे दाखून शालेय व्हरांडा बोलका करण्यात आला आहे. (वार्ताहर)