विद्यार्थ्यांनो, नोटा बदलून आणा!
By Admin | Updated: November 13, 2016 02:52 IST2016-11-13T02:52:01+5:302016-11-13T02:52:01+5:30
केंद्र शासनाच्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता शाळांमधील विद्यार्थ्यांनाही बसत आहे.

विद्यार्थ्यांनो, नोटा बदलून आणा!
पुणे : केंद्र शासनाच्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता शाळांमधील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. पुणे स्टेशन परिसरातील एका नामांकित शाळेकडे विद्यार्थ्यांनी दिवाळीपूर्वी ‘स्पोर्ट ड्रेस’ खरेदीसाठीचे ८०० रुपये शुल्क जमा केले होते. मात्र, आता शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना ५०० रुपयांच्या नोटा परत देऊन १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात शुल्क मागितले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नोटाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारू नये,अशा सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. तरीही विद्यार्थ्यांना ५०० च्या नोटा परत करुन शंभर रुपयांच्या नोटांमध्ये ते शुल्क द्या, असे सांगून शाळेकडून त्रास दिला जात आहे. हे ८०० रुपये विद्यार्थ्यांनी दिवाळीपूर्वी शाळांकडे जमा केले होते. आता ते असा निर्णय कसा काय घेऊ शकतात, असा संतप्त सवालही पालकांमधून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
शाळांकडून विद्यार्थी व पालकांना त्रास देणे योग्य नाही. दिवाळी पूर्वी घेतलेले शुल्क परत देवून ते शंभर व त्याखालील नोटांच्या स्वरुपात मागितले जात असेल तर पालकांनी शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार करावी. तक्रारीनुसार संबंधित शाळेची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- मीनाक्षी राऊत, सहायक शिक्षण संचालक, पुणे विभाग