विद्यार्थी- शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी
By Admin | Updated: October 30, 2015 00:12 IST2015-10-30T00:12:18+5:302015-10-30T00:12:18+5:30
पटपडताळणीत विद्यार्थ्यांच्या बोगस संख्येला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबविण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे.

विद्यार्थी- शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी
पुणे : पटपडताळणीत विद्यार्थ्यांच्या बोगस संख्येला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबविण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांची हजेरी ही याच पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठी प्राथमिक - माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना एका केंद्राची निवड करून प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबविण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. मात्र तीन महिन्यापूर्वी विभागीय उपसंचालक कार्यालयानेही अशा प्रकारेच परिपत्रक काढून बायोमेट्रीक प्रणाली राबविण्याचे सुचविले होते मात्र अद्यापही यास पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे शासनाच्या हस्तक्षेपानंतर ही ही प्रणाली अस्तित्वात येण्यास किती वेळ घेईल याबाबत शंकाच आहे.
सध्या राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने बायोमेट्रीक प्रणालीचा विचार केला जात आहे. शाळांतील गळती शून्यावर आणण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासून त्या अनुषंगाने गळती रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हे पाहिले जाणार आहे. तसेच पटपडताळणीमध्ये अनेकदा विद्यार्थी संख्येचा आकडा फुगवला जातो त्याला चाप बसविण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी घेण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली राबविण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक व माध्यममिकच्या शिक्षणअधिकाऱ्यांना एका केंद्राची निवड करून तेथील सर्व खाजगी व शासकीय शाळांमध्ये ही प्रणाली डिसेंबरपर्यत राबविण्यास शिक्षण विभागाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमेट्रीक पद्धतीने घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)