विद्यार्थ्यांची हाणामारी
By Admin | Updated: June 30, 2015 23:17 IST2015-06-30T23:17:50+5:302015-06-30T23:17:50+5:30
येथील शिवाजी विद्यालय प्रशालेत झालेल्या वादातून दोन गटांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या तुंबळ हाणामारीत चाकू-सुरे

विद्यार्थ्यांची हाणामारी
चाकण : येथील शिवाजी विद्यालय प्रशालेत झालेल्या वादातून दोन गटांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या तुंबळ हाणामारीत चाकू-सुरे वापरून एकमेकांना गंभीर जखमी करण्याची धक्कादायक घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आणखी एका धक्कादायक घटनेने चाकण पंचक्रोशीत विद्यार्थीदशेतील मुलांची बदलती मानसिकता, वैफल्यग्रस्त होऊन घडणाऱ्या घटनांचा प्रभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काल दुपारी झालेल्या या तुंबळ हाणामारीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींवरून आठ ते नऊ जणांवर भा.दं.वि.कलम ३२३,३२४ अन्वये गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. येथील बहुतांश शाळा आणि विद्यालयाचा परिसर आता टगेगिरी करणाऱ्यांची रणभूमी होऊ लागली आहे. भविष्यात दादा होऊ पाहणाऱ्या मुलांची कर्मभूमी ठरत असल्याचा आरोप आता खुद्द नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
प्रशालांच्या परिसरात बंदोबस्त
येथील शिवाजी विद्यामंदिर आणि चाकण शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य महाविद्यालय या भागात रस्त्यावर काही रोड रोमिओंकडून ये-जा करणाऱ्या मुलींना व महिलांना त्रास दिला जात आहे. अनेक अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी शाळा-कॉलेज सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी सुसाट वाहने हाकताना दिसतात. याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी चाकणकर नागरिक, विविध संघटना व पालकांनी केली आहे.
यापुढे संबंधित विद्यालयांच्या आवारात आणि परिसरातील रस्त्यांवर शाळा-कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी सशस्त्र पोलीस गस्त ठेवणार आहेत.
- डी. बी. पाटील,
पोलीस निरीक्षक