अश्लील चित्रफीत काढणा-यास अटक
By Admin | Updated: March 14, 2015 06:20 IST2015-03-14T06:20:09+5:302015-03-14T06:20:09+5:30
संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन

अश्लील चित्रफीत काढणा-यास अटक
पुणे : संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली. तरुणीने यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
गिरीश श्याम सुगंध (वय ३५, रा. शांतीनगर, नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी वानवडी भागात राहण्यास आहे. ती मगरपट्टा येथील संगणक कंपनीत नोकरी करते. तिचे वानवडी भागात आईस्क्रीम पार्लर आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिची अश्लील चित्रफीत काढली. दरम्यान, आरोपी एक दिवस दारू पिऊन दुकानावर आल्यामुळे तिने त्याच्या कानाखाली मारली होती. तसेच त्याला नोकरीवरून काढले होते.
त्यामुळे चिडलेल्या गिरीशने ही चित्रफीत मित्रांना व्हॉट्स अॅपवर पाठवली. तसेच फेसबुकवरही टाकली. याबाबत तिने त्याला विचारणा केल्यावर त्याने ही चित्रफीत फेसबुकवरून काढली. ती पुन्हा फेसबुकवर टाकण्याची धमकी द्यायला त्याने सुरुवात केली होती. तिच्याकडे वारंवार दोन लाख रुपयांची मागणी तो करू लागल्यावर पीडित मुलीने पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनांनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सायबर शाखेच्या सहायक निरीक्षक सीमा साठे यांनी आरोपीबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, तो पीडित मुलीला सारखे दिल्ली, मनमाड, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन बोलावीत होता. पीडित मुलीने त्याला आपल्याला लांब येणे शक्य नसल्याचे सांगून पुण्याला बोलावले. तो पुणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक अनिल पाटील यांनी उपनिरीक्षक मारुती भुजबळ, प्रशांत पवार, संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, रमेश गरुड, सिद्धार्थ लोखंडे, आनंद दळवी, हृषीकेश महल्ले यांनी सापळा लावला. स्टेशन परिसरात आलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.
(प्रतिनिधी)