सत्तावाटपावर अडली आघाडी
By Admin | Updated: January 24, 2017 02:56 IST2017-01-24T02:56:53+5:302017-01-24T02:56:53+5:30
जागांची चर्चा नंतर करूच; पण आघाडी केली तर निवडणुकीनंतर सत्तावाटप कसे करायचे ते आधीच लेखी ठरवू, या काँग्रेसच्या

सत्तावाटपावर अडली आघाडी
पुणे : जागांची चर्चा नंतर करूच; पण आघाडी केली तर निवडणुकीनंतर सत्तावाटप कसे करायचे ते आधीच लेखी ठरवू, या काँग्रेसच्या मागणीवर महापालिका निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीची चर्चा अडली असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने तसा प्रस्ताव दिला असून, त्यावर सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळाली.मावळत्या सभागृहातही
सत्तेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. मात्र, पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची नेहमीच फसवणूक केली, असे काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे. सत्तेची अखेरची दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द देण्यात आला होता; मात्र ते देण्यात आले नाही.
उपमहापौरपद वगळता किरकोळ पदांवर भागविण्यात आले. त्यामुळे या वेळी निवडणुकीनंतर काय व कसे वाटप करणार त्याचा लेखी करार करावा, अशी मागणी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे केली आहे.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांचे जिथे उमेदवार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील, असा प्रस्ताव
ठेवला. मात्र, त्यामध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रईस सुंडके व अन्य काही काँग्रेस नगरसेवकांच्या जागाही राष्ट्रवादीने स्वत:च्या म्हणून मागितल्या आहेत.
काँग्रेसने त्यालाही तीव्र विरोध केला आहे. तुमच्याकडे उमेदवार आला आहे, त्याला मिळालेली
मते मात्र काँग्रेसचीच आहेत व काँग्रेसचीच राहणार आहेत, त्यामुळे त्या जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याही मुद्द्यावर माघार घेण्यात येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसला बजावण्यात आले असल्याची माहिती मिळाली.काँग्रेसच्या वतीने चर्चेत भाग घेणाऱ्या शहराध्यक्ष बागवे व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना मुद्दे सांगितले असून, त्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी किंवा सायंकाळी पुन्हा संयुक्त चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)