शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन
By Admin | Updated: October 3, 2015 01:52 IST2015-10-03T01:52:47+5:302015-10-03T01:52:47+5:30
उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले

शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन
पुणे : उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले. रात्रीसाडेआठपर्यंत २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली. शहरात सगळीकडे पावसाला जोर होता. त्यामुळे ठिक-ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. पावसाचा परिणाम वाहतूकीवरही झाला. सायंकाळी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मंदावली होती. काही चौकांमधील सिग्नल बंद पडल्याने तेथे वाहतूक कोंडीही झाली होती.
गुरूवारी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस गायब होऊन वातावरण ढगाळ झाल्याने उकाडा अधिकच वाढला होता. आज सकाळी आकाश निरभ्र असल्याने लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. त्यामुळे पाऊस येईल, असे वाटत नव्हते. मात्र दुपारी बाराच्या सुमारास आकाशात अचाकनपणे काळे ढग दाटून आले आणि पावसास सुरूवात झाली.सुरूवातीला उपनगरांमध्ये सुरू झालेला पाऊस काही वेळातच शहरातही आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसास सुरूवात झाली. पावसाचा जोर इतका होता काही काही मिनिटांमध्येच रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि रस्त्यांना ओढयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तासभर बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पावसाच्या शिडकाव्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला आणि उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. गुरूवारी ३४ अंशावर गेलेला पारा पावसामुळे शुक्रवारी ३२. १ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला.
पावसाच्या जोरदार धारांमुळे अल्पावधीत रस्त्यावर तळे साचले. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सायंकाळीही पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. लॉ कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता आदी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होता.