पावसाची दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी
By Admin | Updated: October 3, 2015 01:35 IST2015-10-03T01:35:41+5:302015-10-03T01:35:41+5:30
जिल्ह्याच्या ईशान्य मोसमी पावसाने आज दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला

पावसाची दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी
पुणे : जिल्ह्याच्या ईशान्य मोसमी पावसाने आज दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. तसेच भोर, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतही चांगला पाऊस झाला.
जूनमध्ये सरासरी ओलांडून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तो परतला व त्याने त्या महिन्याची सरासरी ओलांडली. ४९ संख्येवर गेलेले टँकर २२ वर आले. बळीराजाला दिलासा मिळाला. खरिपाचे पीक वाया गेल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला निदान रब्बीचे पीक तरी पदरात पडेल याची आशा वाढली. मात्र, पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. बुधवारपासून परतीचा पाऊस सुरू होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. तो गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे प्रत्यक्षात आला. आज दुसऱ्या दिवशीही काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे शुक्रवारी (दि. २) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे-नाले दुथडी वाहत होते.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, रासकरमळा परिसरात मागील दोन दिवसांत दुपारच्या वेळी पावसाच्या सरी पडल्या. (प्रतिनिधी)