बारामतीत पोलीस कार्यालयावर ठिय्या
By Admin | Updated: July 10, 2015 01:20 IST2015-07-10T01:20:11+5:302015-07-10T01:20:11+5:30
गुनवडी (ता. बारामती) येथील माहेर असणाऱ्या धनश्री दिवेकर या विवाहित प्राध्यापिकेला पेटवून देण्यात आले.

बारामतीत पोलीस कार्यालयावर ठिय्या
बारामती : गुनवडी (ता. बारामती) येथील माहेर असणाऱ्या धनश्री दिवेकर या विवाहित प्राध्यापिकेला पेटवून देण्यात आले. तिच्या माहेरचे म्हणजेच बारामती तालुक्यातील गुनवडी गावातील महिला व ग्रामस्थांनी या फरारी आरोपीस अटक करावी, सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील बारामती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. पोलिसांनी या प्रकरणात सासरे रावसाहेब नामदेव दिवेकर, पती रोहन रावसाहेब दिवेकर, सासू अरुणा रावसाहेब दिवेकर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन व सासू अरुणा दिवेकर यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक महिन्याचे वाण म्हणून माहेराहून सोन्याची अंगठी आणण्यावरून अंगावर रॉकेल ओतून पेटवण्यात आले. यात ८५ टक्के भाजून गंभीर जखमी झालेल्या धनश्रीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना रविवारी (दि.५ ) कवठीचा मळा, वरवंड (ता. दौंड) येथे घडली.
धनश्री रोहन दिवेकर (वय २५) हिने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ सासरे रावसाहेब दिवेकर फरार झाले आहेत. धनश्रीचा विवाह ३ जून २०१३ रोजी बारामती येथे झाला. या मोर्चावेळी गुनवडी ग्रामस्थांसोबत महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष
सीमा चव्हाण, अनिता गायकवाड,वर्षा जोजारे, सुवर्णा जगदाळे,ज्योती जाधव या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
आरोपी सासऱ्याला अटक
या प्रकरणात फरार असलेला धनश्रीचा सासरा रावसाहेब दिवेकर याला गुरुवारी (दि.९) दुपारी अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस याचा गांभीर्याने तपास करीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.