लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शासनाने, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करा, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा, ही परिस्थिती अशीच राहिली व रुग्णवाढीचा वेग कायम राहिल्यास एप्रिल महिन्यात लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना दोन आठवड्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक झाली. या वेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे परिस्थिती अशीच राहिली तर येत्या एक एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये लॉकडाऊन बद्दल निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले.
--------
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही जम्बो हाॅस्पिटल तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करणे, ससून हाॅस्पिटलमध्ये 200 बेड्स वाढवणे
- शहर आणि जिल्ह्यातील खाजगी हाॅस्पिटलची 50 टक्के बेड्स कोरोनासाठी ताब्यात घेणे
- शाळा,महाविद्यालय, क्लासेस 30 एप्रिलअखेर पर्यंत बंद राहणार
- एमपीएससीसह दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणारच
- भूमिपूजन, उद्घाटन व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
- लग्न 50 लोकांमध्ये व दशक्रिया विधी 20 लोकांमध्येच करा, अन्यथा गुन्हे दाखल करा
- कोरोना लसीकरणाची क्षमता दुपटीने वाढवणार
- उद्याने साकाळच्या वेळी नेहमीप्रमाणेच सुरू राहणार
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
- होळी, धुळवडच्या कार्यक्रमांवर बंदी
- माॅल, हॉटेल, रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहणार
--------