सुरक्षेबाबत पोलिसांना सक्त सूचना
By Admin | Updated: July 4, 2015 00:30 IST2015-07-04T00:30:54+5:302015-07-04T00:30:54+5:30
सिंहगड रस्ता परिसरात माथेफिरुने वाहनांची तोडफोड केल्यानंतर सोसायट्यांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षेचा आढावा ‘लोकमत्’ाने बुधवारी रात्री केलेल्या ‘सिक्युरिटी चेक’ मधून घेतला.

सुरक्षेबाबत पोलिसांना सक्त सूचना
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात माथेफिरुने वाहनांची तोडफोड केल्यानंतर सोसायट्यांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षेचा आढावा ‘लोकमत्’ाने बुधवारी रात्री केलेल्या ‘सिक्युरिटी चेक’ मधून घेतला. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पोलीस अधिका-यांना अधिक प्रभावी गस्त घालण्याच्या तसेच सोसायट्यांमधून सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळवंत काशिद यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर एका माथेफि रुने विविध सोसायट्यांमधील तसेच रस्त्यावरील वाहनांना पेटवले होते. पेट्रोलच्या टाकीचे पाईप काढून त्याला आग लावून पसार झालेला हा माथेफिरु अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. अशा प्रकारे सर्वसामान्यांची वाहने जाळणे आणि त्यातील आरोपी न सापडणे हे पोलीस दलाचे अपयश असल्याचेही पाठक म्हणाले. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखेची चार पथके दररोज दिवस रात्री सिंहगड रस्ता आणि शहरात गस्त घालत आहेत. पोलिसांचा काही जणांवर संशय बळावला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. परंतु हे संशयीत सध्या तरी भूमिगत झालेले आहेत.
दरम्यान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा जटील झाला होता. यामुळे दोन आठवड्यांपूर्वीच पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना विशेष शाखेत बदलण्यात आले होते. आयुक्त पाठक यांनी वरिष्ठ निरीक्षक यांना शुक्रवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.