पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
By Admin | Updated: January 26, 2015 01:36 IST2015-01-26T01:36:48+5:302015-01-26T01:36:48+5:30
येथील पोलीस ठाण्यास हद्दीचा वाद न करता गुन्हे नोंदवून घ्यावेत, रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
कामशेत : येथील पोलीस ठाण्यास हद्दीचा वाद न करता गुन्हे नोंदवून घ्यावेत, रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच रेल्वे परिसर आणि शहरातील अवैध धंदे बंद करावे. यासाठी शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शहरात कडकडीत बंद पाळून पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक झालीच पाहिजे, हप्तेबाजी बंद करा, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे असा नारा देत नागरिकांनी रेल्वे स्थानकापासून पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढला.
आमदार संजय भेगडे, माजी सभापती राजाराम शिंदे, माऊली शिंदे, भरत मोरे, सुकन बाफना, तानाजी वाघवले, विलास भटेवरा, रमेश लुणावत, प्रतिक टाटिया, सुभाष रायसोनी, महेंद्र ओसवाल, पृथ्वीराज गदिया, करण ओसवाल, रोहिदास वाळुंज, शहरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. शहरातील अवैध धंदे गुन्हेगारीला खत पाणी घालीत असल्याचा रोष आंदोलनकर्त्यांत होता. मागील आठ दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोळीकडून मारहाण केली जात असून मौल्यवान वस्तु बळकविण्याचा प्रयत्न केला जातो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास लोणावळावरून अक्षय प्रवीण सोलंकी, बबलु संजय सोलंकी, शुभम कांतीलाल जन्ौ व हर्षल ललित गदिया हे चार तरूण कामशेत रेल्वे स्टेशनला उतरले. रेल्वेपुलावरून जाताना पायात डोके ठेवून झोपेचे सोंग घेतलेला तरुण या चार तरुणांना धमकावून त्यांच्या मागे दगड घेऊन धावला. त्या तरुणाचे इतर सहकारीही धावून आले. त्यांना प्रवाशांना मारहाण केली. त्यात अक्षयच्या डोक्यात दगड मारला असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवाशांना लुटणाऱ्या या टोळीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या पोलिसांनी हद्दीच्या वादावरून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर
अवैध धंद्यामुळे अशा प्रकारात वाढ होत असून शहरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी सकाळपासून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
माजी सरपंच माऊली शिंदे म्हणाले, ‘‘दोन वर्षापूर्वी शहरात अवैध धंदे नव्हते. सध्या मात्र दारू, गांजा, चरस, मटका, क्लब असे धंदे सुरू असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. सातबाराच्या केसेसमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष देतात. पोलिसांनी सर्वसामान्यांना संरक्षण द्यावे.
रोहिदास वाळुंज यांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याकडे लक्ष वेधले. स्वतंत्र पोलीस स्टेशन झाल्यावर पोलिसांची संख्या वाढले.
पोलीस निरीक्षक विजय
जाधव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी रात्री दोन संशयितांना पकडले असून, त्याची चौकशी सुरू आहे.(वार्ताहर)