शेवटच्या तासातील गर्दीमुळे ताण
By Admin | Updated: February 22, 2017 03:20 IST2017-02-22T03:20:23+5:302017-02-22T03:20:23+5:30
नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्रमांक २९) मध्ये रावसाहेब पटवर्धन शाळेत केवळ एका केंद्रामध्ये

शेवटच्या तासातील गर्दीमुळे ताण
पुणे : नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्रमांक २९) मध्ये रावसाहेब पटवर्धन शाळेत केवळ एका केंद्रामध्ये झालेल्या मतदानासाठी शेवटच्या तासातील गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेपुढे ताण निर्माण झाला. मतदानाची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी बंद केलेल्या गेटबाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतर पांगापांग झाली.
या शाळेतील बहुतेक सर्व केंद्रांवर शुकशुकाट असताना अचानक दुपारी सव्वाचारनंतर केंद्र क्रमांक २९वर गर्दी झाली. लोक रांगेत घुसून थांबण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. विशेष म्हणजे ७६७ मतदान असलेल्या या केंद्रावर पहिल्या दोन तासात ४.८२, चार तासांत ६.७७, सहा तासांत १०.४३ आणि दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत १३.५२ टक्के मतदान झाले होते.
वेळ संपल्यानंतरही आत येऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची वादावादी होत होती. उपायुक्त पंकज डहाणे यांना ही माहिती समजल्यावर ते कुमक घेऊन आले. त्यानंतर जमाव पांगला. मतदान संपण्यापूर्वी झालेल्या या गर्दीमुळे अनेकांना विस्मय वाटला.
(प्रतिनिधी)