नीरा शहरात तणाव
By Admin | Updated: August 24, 2015 02:45 IST2015-08-24T02:45:56+5:302015-08-24T02:45:56+5:30
नीरा येथे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी

नीरा शहरात तणाव
नीरा : नीरा येथे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी दोघांना जमावाने मारहाण केली. ही घटना सायंकाळी ६.३० च्या सुमारास अहिल्याबाई होळकर चौकात घडली. या प्रकारामुळे नीरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन प्रमुख बाजारपेठ तत्काळ बंद पडली होती.
नीरा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. याचे पडसाद या घटनेवरून दिसून आले. जि. प. सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे व विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह दोघांवर पाच- सहा जणांच्या जमावाने अचानक हल्ला करून मारहाण केली. यामध्ये विकास आघाडीचे हे तिघे नेते जखमी झाले आहेत. नीरा शहराच्या प्रमुख बाजारपेठेच्या होळकर चौकात ही घटना घडल्यानंतर तत्काळ दुकाने बंद केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनस्थळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, प्रमोद काकडे यांनी घटनास्थळी येऊन काकडे गटाच्या समर्थकांना शांत करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, काकडे गटाच्या समर्थकांनी आरोपीच्या अटकेसाठी होळकर चौकात बराच वेळ ठिय्या मांडला होता. रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अशोक भरते यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल नव्हती. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नीरा शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. (वार्ताहर)