स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रनिर्मितीची ताकद
By Admin | Updated: January 9, 2015 01:01 IST2015-01-09T01:01:23+5:302015-01-09T01:01:23+5:30
स्वच्छ भारत अभियाना’त राष्ट्रनिर्मितीची ताकद असून, हे अभियान नागरी सुराज्याचा शुभारंभ असल्याचे मत केंद्रीय वने आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रनिर्मितीची ताकद
कोथरूड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त राष्ट्रनिर्मितीची ताकद असून, हे अभियान नागरी सुराज्याचा शुभारंभ असल्याचे मत केंद्रीय वने आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
कोथरूडच्या मयूर कॉलनीत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत आज जावडेकर सहभागी झाले होते, त्या वेळी ते बोलत
होते.
आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, संयोजिका डॉ. प्राची जावडेकर, डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका मोनिका मोहोळ, मुरलीधर मोहोळ, जगन्नाथ कुलकर्णी, अॅड. एस. के. जैन, प्रा. ए. पी. कुलकर्णी, मंदार घाटे, राहुल दावल, रितेश वैद्य, मनीषा बुटाला, अनिता तलाठी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, ‘‘आपण स्वत: स्वच्छ राहातो; पण बाहेर कचरा करतो ही सवय बदलण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कचऱ्याचे संकलन, घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी दर शंभर मीटरवर व्यवस्था आणि मलनिस्सारणाची महापालिकेने प्रभावी व्यवस्था करणे आवश्यक आहे.’’
स्वच्छता अभियानात मयूर कॉलनी व परिसरातील गृहरचना संस्था आणि बाल शिक्षण शाळा, पी. जोग शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)