आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मार्केट यार्डातील रस्ते झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:03+5:302021-03-15T04:12:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मार्केट यार्डातील रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा ...

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मार्केट यार्डातील रस्ते झाले चकाचक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मार्केट यार्डातील रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी गेल्या पंधरा दिवसांतच मार्केट यार्डातील बहुतेक सर्व रस्ते चकाचक झाले आहेत. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजार आवारदेखील सॅनिटायझेशन पूर्ण केले. याबाबत व्यापाऱ्यांकडून बाजर समिती प्रशासकाचे आभार मानत आहे.
बाजार समिती आवारात नेहमी प्रचंड वाहतूक आणि वर्दळ असल्याने सतत रस्त्यांची दुरवस्था होत असते. याबाबत बाजार समितीकडून देखील रस्ते दुरुस्तीवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांची कामे व्यवस्थित व वेळेवर पूर्ण होत नाहीत. याचा त्रास मात्र बाजार घटकांना सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर दि पूना मर्चंट चेंबरच्या वतीने रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत मधुकांत गरड यांनी भुसार बाजार आवारातील रस्त्यांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले होती, परंतु त्यावेळी कोणी आंदोलन करण्याचे कष्ट घेतले नाही, असे स्पष्ट मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.
गरड यांनी केवळ मत व्यक्त केले नाही तर प्रशासक म्हणून आपली जबाबदारी देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या पंधरा दिवसांत गेट क्रमांक ५, गेट क्रमांक ९ मधील रस्ते, भाजीपाला विभागातील व अन्य रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे देखील बुजविण्यात आले आहे.
--
कोट
पायाभूत सुविधा देणे हेच बाजार समितीचे काम
बाजार समितीतील गूळ भुसार विभागातील रस्त्याचे कंत्राट २०१८ मध्ये देण्यात आले होते. हे काम १२ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांनी हे काम तीन वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही. यामुळेच व्यापारीवर्ग आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. अखेर मागील तीन वर्षांत झाली नाही तेवढी सर्व रस्त्यांची कामे गेल्या पंधरा वर्षांत पूर्ण केले. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजार आवार सॅनिटायझेशन देखील पूर्ण केले आहे. सर्व बाजार घटकांना पायाभूत सुविधा देणे हेच बाजार समितीचे मुख्ये काम असून, ते नियमितपणे केले जाईल.
- मधुकांत गरड, प्रशासक पुणे बाजार समिती
चौकट
‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली
चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांनी त्याच वेळी खर तर ठिय्या आंदोलन करणे गरजेचे होते. तेव्हा हा विषय गंभीर नव्हता का? आंदोलन करण्याच्या कर्तव्यात ‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली, असा टोला गरड यांनी आंदोलकांना लगावला.