स्टॉल घोटाळा आता आयुक्तांच्या कोर्टात
By Admin | Updated: September 27, 2016 04:18 IST2016-09-27T04:18:14+5:302016-09-27T04:18:14+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वाटलेल्या स्टॉलचा घोटाळा आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी

स्टॉल घोटाळा आता आयुक्तांच्या कोर्टात
पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वाटलेल्या स्टॉलचा घोटाळा आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी आयुक्तांना पत्र दिले असून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची दिशाभूल करून जादा दराने खरेदी केलेल्या स्टॉलच्या रकमा वसूल करा, अशी मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहापुढे कोंडे यांनी हा स्टॉल घोटाळा मांडला होता. ३० हजारांचा स्टॉल ७३ हजारांना वाटल्याचा त्यांचा आरोप असून, त्यात सुमारे २ कोटींच्या आसपास पुरवठादाराला जादा पैसे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सन २०१५-१६च्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय व अपंगांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉलवाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. त्यानुसार निविदा काढून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने मागासवर्गीयांसाठी ३ कोटीच्या ४१० स्टॉल व अपंगांसाठी १ कोटी ५० हजारांचे २०५ असे ४ कोटी ५० हजारांचे ६१५ स्टॉल खरेदी केले. हे स्टालॅ स्टील फॅब नावाच्या ठेकेदाराकडून जिल्हा परिषदेने घेतले आहेत. यापूर्वी २५ ते २७ हजारांना घेतलेले स्टॉल यावर्षी ७३ हजारांना घेतल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जि.प. ठराव क्र. ६५८ नुसार या आदेशाला मंजुरी दिली आहे. मात्र, या साहित्याच्या बाबातीत तांत्रिक व दराचे असे दोन्ही लिफापे सभेपूर्वीच उघडलेले असताना निविदा स्वीकृती झालेली नाही, असे सांगून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली. मात्र, त्याच दिवशी ही निविदा उघडण्यात आली होती. निविदेतील अटी व शर्ती या ठराविक अपेक्षित पुरवठादारांनाच निविदा भरता याव्यात, यासाठी खरेदी समीतीने तयार केल्याचेही कोंडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
...अन्यथा मी उपोषण करेन
कोंडे यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. जादा दराने खरेदी केल्याने गोरगरिबांच्या वाट्याला येणारे स्टॉल त्यांना मिळाले नाहीत. साहेब, तुम्ही याची चौैकशी करून काय ते बाहेर काढले पाहिजे. नाही तर, मी जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणास बसेन, असे कोंडे यांनी देसाई यांना सांगितले. यावर त्यांनी कोंडे यांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असे अश्वासन दिले आहे.
साहित्याचे दर सभेच्या दिवशीच सकाळी उघडले होते; परंतु अवास्तव दर सभेसमारे आल्यास विरोध होईल म्हणून जाणीवपूर्वक ही बाब सभागृहासमोर आणली नाही. सभागृहाची दिशाभूल करून ३० हजारांचे स्टॉल ७३ हजारांना घेतले.
-कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्य