चासकमान धरणामधून विसर्ग केला बंद
By Admin | Updated: January 19, 2016 01:41 IST2016-01-19T01:41:28+5:302016-01-19T01:41:28+5:30
चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर

चासकमान धरणामधून विसर्ग केला बंद
चासकमान : चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर रविवारी (दि. १७) रात्री उशिरा हे पाणी बंद करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे व शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली.
जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपत्ती प्राधिकरणाकडे उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली होती. पंरतु यंदा पाऊसच कमी झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातीलच धरणे भरली नाहीत. याविरुद्ध आमदार सुरेश गोरे व बाबूराव पाचर्णे यांनी जलप्राधिकरणापुढे भूमिका मांडली.
मागील आठवड्यात जलप्राधिकरणाने उजनीत १० टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देत भामा-आसखेड धरणातून ६१.५१ एम.एम.क्यूब म्हणजेच सुमारे २ टीएमसी व चासकमान धरणातून २०.७० एम.एम.क्यूब म्हणजेच
०.८ टीएमसी पाणी सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांच्या आदेशानुसार बुधवारपासून (दि.१३) या दोन्ही धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती.
धरणाच्या चार दरवाजांद्वारे सुमारे ०.७३ टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. (वार्ताहर)