न्हावरेत पाण्यासाठी रास्ता रोको!
By Admin | Updated: August 22, 2015 02:02 IST2015-08-22T02:02:31+5:302015-08-22T02:02:31+5:30
न्हावरेसह परिसरातील १४ गावांच्या शेती तसेच पिण्यासाठी चासकमान कालव्याच्या पाण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने

न्हावरेत पाण्यासाठी रास्ता रोको!
न्हावरे : न्हावरेसह परिसरातील १४ गावांच्या शेती तसेच पिण्यासाठी चासकमान कालव्याच्या पाण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने आवर्तन सुटून एक महिना होत आला, तरी शिरूरच्या पूर्व भागाला अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करून सुमारे तासभर न्हावरे (ता. शिरूर) येथील शिरूर-चौफुला राज्यमार्ग रोखला व रास्ता रोको आंदोलन केले.
साधारणपणे चासकमानच्या कालव्याचे आवर्तन सोडून २४ दिवस झाले, तरी शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अद्याप पाणी पोहोचले नाही. यामुळे ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली. सुरू असलेले अवर्तन सोडताना ते टेल भागाकडून सोडण्यात येईल, अशी घोषणा संबंधित लोकप्रतिनिधी व चासकमानच्या अधिकाऱ्यांनी केली होती; मात्र या भागात आवर्तन सोडताना अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेमुळे या भागात पिकांच्या झालेल्या नुकसानाला चासकमाने अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्याची भरपाई संबंधितांनी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करीत आंदोलक शेकऱ्यांनी चासकमानच्या अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य मनीषा कोरेकर, घोडगंगाचे संचालक प्रा. गोविंदराजे निंबाळकर, रवी काळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, बाळासाहेब कोरेकर, माजी सरपंच अतुल बेंद्रे, महादेव जाधव, पोपटराव थिटे, माजी उपसरपंच अशोक कोळपे, गोपाळ हिंगे, बापू काळे, दिलीप बेंद्रे, दत्तात्रय निंबाळकर, प्रकाश बहिरट, सुभाष कोकडे आदी परिसरातील १४ गावांचे शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी आंदोलन स्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या बेदखल कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)