सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रास्ता रोको
By Admin | Updated: December 23, 2015 00:04 IST2015-12-23T00:04:10+5:302015-12-23T00:04:10+5:30
जुन्नर तालुक्यातील शेतकरी, नागरिक व व्यावसायिक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना

सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रास्ता रोको
आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील शेतकरी, नागरिक व व्यावसायिक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या वतीने आळेफाटा येथे सोमवारी (दि. २१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सध्याचे जुन्नर तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न प्रशासनाच्या वतीने न सोडवल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी या वेळी दिला. आज सकाळीच आळेफाटा चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. गणेश गुंजाळ यांनी प्रास्तविक करताना या रास्ता रोको आंदोलनाबाबत माहिती दिली.
या वेळी बुचके म्हणाल्या, तालुक्यातील जमिनी संपादित केलेल्या शेतकरीवर्गाला न्याय मिळाला नाही. मढ ते आणेदरम्यान सुरू असलेल्या कामामुळे होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष, चौपदरीकरणकामातील शेतकरी वर्गाला संपादित जमिनीसाठी योग्य मूल्य देण्याकडे व तालुक्यातील इतरही प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे.
बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा परिषद सदस्या मीरा खंडागळे, पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, विघ्नहर संचालक पप्पू हाडवळे, जुन्नर नगरसेवक मधुकर काजळे, अनिल फुलपगार, अविनाश करडिले, संजय गाढवे, विलास वाघोले, मयूर गुंजाळ, उदय पाटील भुजबळ, शाम पांडे उपस्थित होते. या वेळी तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.