नोटाबंदीविरोधात रास्ता रोको
By Admin | Updated: January 12, 2017 02:08 IST2017-01-12T02:08:56+5:302017-01-12T02:08:56+5:30
येथील घोटावडेफाटा चौकात मोदी सरकारच्या नोटाबंदीविरोधात मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

नोटाबंदीविरोधात रास्ता रोको
पिरंगुट : येथील घोटावडेफाटा चौकात मोदी सरकारच्या नोटाबंदीविरोधात मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घोटावडेफाटा चौकामध्ये एकत्र आले होते. त्यांनी मुळशी तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या चौकामध्ये वाहतूक रोखून आंदोलन केले.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की आम्हाला सत्ता द्या, आम्ही भारताचा सिंगापूर करू. पण, आज नोटाबंदी करून भारताचा सिंगापूर करण्याऐवजी शनिशिंगणापूर करून टाकला आहे. सद्य:स्थितीमध्ये सामान्य माणूस हा दार, कवाडे उघडी ठेवून झोपत आहे. कारण बँकेतून पैसा काढायला लोकांना संधी नाही. गरिबांचा पैसा बँकेतच अडकला आहे. धनाढ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. शेतकरी, शेतमजूर आज देशोधडीला लागला आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
या आंदोलनामध्ये मुळशी माझी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, सभापती महादेव कोंढरे, उपसभापती सारिका मांडेकर, गटनेते शांताराम इंगवले, जि. प. सदस्या स्वाती हुलावळे, माजी सभापती बाबा कंदारे, माजी उपसभापती सविता पवळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग ओझरकर, जितेंद्र इंगवले, सागर धुमाळ, वैशाली गोपालघरे, महिला अध्यक्ष चंदा केदारी आदी उपस्थित होते.(वार्ताहर)