पुणे : एसएनडीटी महाविद्यालयाजवळ च्या जलवाहिनीला गळती लागली होती. १२०० एमएमच्या एमएसलाईनला वर्तुळाकार छिद्र पाडून त्यातून काही कर्मचारी ६० मीटर लांब आत चालत गेले. त्यांना तीन ठिकाणी वाहिनी फुटलेली आढळली. त्यावर केमिकलचा लेप लावून सिमेंटने ती छिद्र बुजवण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेले काम रात्री साडेआठ वाजता संपले व रोज लाखभर लिटर पाणी वाया जात होते ते वाचले. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या प्रभागात एसएनडीटी महाविद्यालयाजवळ ही गळती होत होती. हे काम प्राधान्याने व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालवले होते, मात्र, वाहिनीतून पाणी जात असल्याने काम करता येणे शक्य होत नव्हते. आयुक्त सौरव राव यांनी दिवाळीपुर्वी या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी दिवाळीनंतर हे काम करण्याचे आश्वासन दिले होते. गुरूवारी या भागाचा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे वाहिनी कोरडी होती. त्यामुळे काम करता आले व गळती थांबली. सहस्त्रुबद्धे म्हणाल्या,१२०० एमएमच्या एमएसलाईनला वर्तुळाकार छिद्र पाडून त्यातून काही कर्मचारी ६० मीटर लांब आत चालत गेले. त्यांना तीन ठिकाणी वाहिनी फुटलेली आढळली. त्यावर केमिकलचा लेप लावून सिमेंटने ती छिद्र बुजवण्यात आली. या कर्मचाऱ्यांना आत काम करता यावे व श्वास घेताना त्रास होऊ नये. यासाठी आत दिवा व प्राणवायूच्या दोन ट्यूब सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजता सुरु झालेले हे काम अखेर रात्री साडेआठ वाजता पुर्ण झाले. पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता गजभिये यांनी हे काम पूर्ण केले. महाविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. देवरे, सोळंकी व सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कामासाठी साह्य केले. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे वाया जाणारे पाणी वाचवता आले याचे समाधान असल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाल्या.
तब्बल साडेआठ तासांच्या अथक प्रयत्नातून थांबली जलवाहिनीची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 19:25 IST
गळती होत असलेल्या जलवाहिनीचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालवले होते, मात्र, वाहिनीतून पाणी जात असल्याने काम करता येणे शक्य होत नव्हते.
तब्बल साडेआठ तासांच्या अथक प्रयत्नातून थांबली जलवाहिनीची गळती
ठळक मुद्दे तीन ठिकाणी फुटलेली वाहिनी केमिकलचा लेप लावून सिमेंटने बुजवली.