मानधनाअभावी होडी बंद
By Admin | Updated: June 17, 2015 23:22 IST2015-06-17T23:22:05+5:302015-06-17T23:22:05+5:30
वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार

मानधनाअभावी होडी बंद
कामशेत : वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे येऊनही सेवा खंडित होत आहे.
सन १९२२ च्या सुमारास दि टाटा पॉवर सप्लाय कंपनीने वीजनिर्मितीसाठी इंद्रायणीनदीवर वडेश्वर गावाजवळ ठोकळवाडी धरण बांधले. आंदर मावळातील सह्याद्री डोंगर पठार आणि शिवारातील पाण्याच्या धरणात साठा वाढला. या पाण्यावर भिवपुरीजवळ टाटाचा वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला. या विजेवर मुंबई शहराला वीजपुरवठा होत आहे.
धरणातील पाणीसाठ्यामुळे आंदर मावळातील पश्चिम भागातील धरणाच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन भागांत विभागणी झाली. वडेश्वर, सटवाईवाडी, शिंदेवाडी, घाटेवाडी, वहानगाव, नागायली, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, कुसुर या गावांना धरणापलीकडील माळेगाव, परी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक, कुणे, अनसुटे, पारीठेवाडी, इंगळुण या गावांना जोडण्यासाठी माळेगाव ते वहानगाव दरम्यान नावेची व्यवस्था करण्यात आली.
या गावातील सोयरसंबंध आणि नातीगोती या नावेतील रेशमगाठीने अधिक घट्ट झाली. माहेरवासीण सुना, लेकी अलीकडे पलीकडे जाऊ लागल्या. सुख-दु:खाला सोयरे धावू लागले. वीस वर्षांपूर्वी आंदरमावळ सहकारी दूधउत्पादक संस्थेला होणारा धरणापलीकडील दूधउत्पादकांचा दूधपुरवठा याच नावेतून होत होता, तर वरसुबाई या देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक याच नावेतून प्रवास करून जात होते.
नावाड्याच्या तीन पिढ्या नावेवर राबत होत्या. कै. रूपा शिवा बोऱ्हाडे यानंतर त्यांचा मुलगा कै. चंदर रुपा बोऱ्हाडे आणि आता नातू मारुती चंदर बोऱ्हाडे नाव चालवत आहेत. यापैकी रुपा बोऱ्हाडे आणि चंदर बोऱ्हाडे यांना जिल्हा परिषदेच्या कामगारांच्या दर्जानुसार मानधन दिले जायचे. यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.
सकाळी सात ते सायंकाळी सात अशा बारा तास बोऱ्हाडे कुटुंबीय या परिसरातील प्रवाशांची सेवा करीत होते. या नावेतूनच लग्नाचे वऱ्हाड त्यांनी पाहिले. प्रसूतीसाठी महिला नावेत बसून वडेश्वरला रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. अंत्यविधी, दशक्रिया, बारसे, यात्रा, जत्रा या समारंभाला नागरिकांचे येथे जाणे होते.
मात्र चंदर बोऱ्हाडे यांच्या मृत्यूनंतर नावाड्याच्या मानधनावरून प्रश्न निर्माण होऊन काही काळ जि. प. येथे शासकीय लाँच ठेवली. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. तेही स्थानिक नसल्याने कधी वेळेवर पोहोचत नव्हते. लाँच बंद पडून पुन्हा नव्याने नावेची व्यवस्था झाली. मात्र, नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे आला. (वार्ताहर)