मंचर शहराच्या भरवस्तीत चोरी
By Admin | Updated: January 28, 2015 02:26 IST2015-01-28T02:26:08+5:302015-01-28T02:26:08+5:30
शहराच्या भरवस्तीत असणारे नॅशनल वॉच शोरूमच्या लोखंडी शटरला असलेली कुलपे बनावट चावीने उघडून चोरट्यांनी सुमारे १४ लाख ४० हजार रुपयांची घड्याळे चोरून नेली

मंचर शहराच्या भरवस्तीत चोरी
मंचर : शहराच्या भरवस्तीत असणारे नॅशनल वॉच शोरूमच्या लोखंडी शटरला असलेली कुलपे बनावट चावीने उघडून चोरट्यांनी सुमारे १४ लाख ४० हजार रुपयांची घड्याळे चोरून नेली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसून आले असल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले़
मंचर शहरातील भरवस्तीतील शिवाजी चौकात शाहिद सय्यद यांचे टायटन कंपनीचे नॅशनल वॉच या नावाचे शोरूम आहे.
नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता मालक शाहिद सय्यद यांचा मुलगा साद सय्यद हा दुकान उघडण्यासाठी गेला.
त्या वेळी लोखंडी शटरचे अंतर्गत असणारे सेंटर लॉक डुप्लिकेट चावीने उघडल्याचे दिसून आले. त्याने वडिलांना दुकानात चोरी झाल्याचे फोन करून सांगितले.
मंचर पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला, त्या वेळी टायटन, रिको, मॅक्स अशी एकूण बाराशे घड्याळे चोरीला गेली. तसेच ड्रॉवरमधून ३० हजार रुपये रोकड अशी एकूण १४ लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी पहाटे २ वाजून ५३ मिनिटे ते ३ वाजून ७ मिनिटे या दरम्यान दुकानात ३ चोरट्यांनी घड्याळाची चोरी
केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग तसेच ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरीचा तपास पोलीस निरीक्षक मोहन जाधव करीत आहेत. (वार्ताहर)