चोरीची प्रवासी बोट वाळूमाफियांनी जाळली?
By Admin | Updated: March 24, 2017 03:55 IST2017-03-24T03:55:10+5:302017-03-24T03:55:10+5:30
दौंडला भीमा नदीपात्रातून फायबर होडीतून प्रवास करणारे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनादेखील वाळूमाफियांनी अडचण करुन ठेवली

चोरीची प्रवासी बोट वाळूमाफियांनी जाळली?
दौंड : दौंडला भीमा नदीपात्रातून फायबर होडीतून प्रवास करणारे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनादेखील वाळूमाफियांनी अडचण करुन ठेवली असल्याची वस्तुस्थिती आहे. गार (ता. श्रीगोंदा) ते दौंड यादरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसभरात बऱ्यापैकी असते. मात्र सदरची प्रवासी बोट गेल्या आठवड्यात चोरीला गेली असल्याची तक्रार श्रीगोंद्याचे ग्रामसेवक भाऊसाहेब गलांडे यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार सदरची बोट वाळूमाफियांनी जाळून टाकली असल्याचे समजते. परिणामी बोट नसल्याने विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची कुचंबणा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना दूरच्या मार्गाने दौंडला यावे लागते.
गार ग्रामपंचायतीला १ लाख रुपये किमतीची फायबरची बोट अहमदनगर जिल्हा परिषदेने दिली होती. ही बोट बचत गटाचे बापू गायकवाड यांना मासिक भाडे तत्त्वावर ग्रामपंचायतीने दिली होती. गार येथून शिक्षणासाठी तसेच व्यापारासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ दौंडला या बोटीतून येत असतात. मात्र सध्या बोट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना दूर अंतरावरुन वळसा मारून दौंडला यावे लागत आहे.