उड्डाण पुलाची अजूनही प्रतीक्षाच
By Admin | Updated: July 2, 2017 03:05 IST2017-07-02T03:05:27+5:302017-07-02T03:05:27+5:30
कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक

उड्डाण पुलाची अजूनही प्रतीक्षाच
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्वेनगर : कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा वर्षांपूर्वी या पुलाचे उद्घाटन केले होते, त्या वेळी काम दोन वर्षांत पूर्ण करू, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते. पण, पालिका प्रशासनाला या वायद्याचा विसर पडला आहे, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
मार्च २०१७ मध्ये आयुक्त कुणाल कुमार आणि स्थानिक नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी नागरिकांसह पाहणी केली असता ठेकेदारांकडून १५ जून २०१७ला पुलाची एक बाजू म्हणजे वारजेकडून कोथरूडकडे जाणारी एक बाजू, तरी नक्कीच चालू करू, असे आश्वासन आयुक्तांना मिळाले होते. पण, आज मितीला मुदत संपूनदेखील या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले आहे. या अपूर्ण पुलामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी पाच वर्षांपासून नागरिक अनुभवत आहेत. एवढेच नाही, तर जीवितहानीदेखील झाली आहे. किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल नागरिका करीत आहेत.
शाळेला उशीर : सर्व स्तरातून निषेध
शाळा सुरू झाली असून, वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेला दररोज उशीर होत आहे. याठिकाणी रस्त्यावर पावसाळ्यात कायम पाणी साठत असते. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहनचालकांना मोठे दिव्य पार पाडावे लागते, त्यातच अपघात होत आहेत, नागरिक जखमी होत आहेत. पालिकेच्या या ढिसाळ कामाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अशी होत आहे.