आजीला मारहाण करून चोरी
By Admin | Updated: February 17, 2017 05:10 IST2017-02-17T05:10:01+5:302017-02-17T05:10:01+5:30
वयोवृद्ध आजीचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत नातवाने तीन साथीदारांच्या मदतीने रोकड लंपास केली. ही घटना गोखलेनगर

आजीला मारहाण करून चोरी
पुणे : वयोवृद्ध आजीचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत नातवाने तीन साथीदारांच्या मदतीने रोकड लंपास केली. ही घटना गोखलेनगर परिसरात रविवारी दुपारी घडली. चतु:शृंगी पोलिसांनी नातवाला बेड्या ठोकल्या आहेत. तो एका राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचेही समोर आले आहे.
प्रवीण दत्तू डोंगरे (वय २६, रा. वैदूवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. या प्रकरणी त्याची आजी (वडिलांची आई) तगलू डोंगरे (वय ६६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे यांच्या मालकीच्या बाणेर, वैदुवाडी तसेच अन्य ठिकाणी सदनिका आहेत. या सर्व सदनिका त्यांनी भाड्याने दिल्या असून त्याचे साधारणपणे एक ते दीड लाख रुपये भाडे मिळते. आरोपी प्रवीणचे लग्न झालेले आहे. राजकारणाची आवड असलेल्या प्रवीणला पैशांची नेहमी गरज असते. त्यामुळे तो आजीला पैशांसाठी त्रास देऊन पैसे घेऊन जातो.
राहते घर नावावर करून देण्यासाठी तो आजीला मारहाण करीत होता. रविवारी त्याने तीन साथीदारांसह डोंगरे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत तोंड दाबून धरले. त्याच्या तीन साथीदारांनी त्यांचे हात व पाय दोरीने बांधले. त्यानंतर लोखंडी सळईने कपाट फोडले. त्यातील ७० हजारांची रोकड चोरून नेली. दरम्यान, डोंगरे यांनी आरडाओरडा करताच शेजारी राहणारा डोंगरे यांचा दुसरा मुलगा व मुलगी धावत आले. त्यांना पाहताच प्रवीण शिवीगाळ करीत पसार झाला. फिर्याद येताच त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)