राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:39 AM2018-07-16T05:39:32+5:302018-07-16T05:39:41+5:30

राज्यात सहा जिल्हे वगळता दीड महिन्यांत सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून कोकणात सरासरीच्या ५२ टक्के अधिक पाऊस झाला

The state received more rainfall than the average | राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Next

पुणे : राज्यात सहा जिल्हे वगळता दीड महिन्यांत सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून कोकणात सरासरीच्या ५२ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ मुंबई उपनगरात ८८, पालघरमध्ये ७०, अकोला जिल्ह्यात ७१ टक्के अधिक पाऊस झाला. नंदूरबारमध्ये २८ टक्के कमी पाऊस झाला आहे़
रविवारी मुंबई, ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. पंचगंगा नदीला पूर आला असून सहा राज्य तर १२ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. साताऱ्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. सांगलीत चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे खुले केले. वारणा नदीला पूर आला आहे.
नाशिकमध्ये पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, धरण ६० टक्के भरले आहे. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या हनुमानाच्या मूर्तीच्या पायाला पाणी लागले होते.
मागील आठवड्याभर विश्रांती घेतल्यानंतर रविवारी नागपूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. दुपारनंतर शहरात सुमारे तासभर पावसाची संततधार होती.
>पुणे जिल्ह्यातील
धरणे निम्मी भरली
पुणे जिल्ह्यातील २५ पैकी सुमारे १२ धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. खडकवासला धरण ९१ टक्के भरले असून, पूर नियंत्रणासाठी सोमवारी सकाळी ८ वाजता धरणातून नदीत २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
>तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू झाल्याने, गोदावरी नदीच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुराची पातळी मोजण्याचे पारंपरिक साधन असलेल्या नदीपात्रातील असलेल्या दुतोंडी मारुतीच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला आहे. मारुतीच्या कंबरेपर्यंत पातळी आल्यास पूर आल्याचे समजले जाते.
>कोकणातील ७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्रातील १० पैकी ३ जिल्हे, मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ विदर्भातील बुलडाणा येथे कमी पाऊस झाला आहे़
>६ जिल्ह्यांत कमी पाऊस
धुळे, नंदूरबार, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, सांगलीत सरासरीपेक्षा कमी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. रविवारी सुट्टीदिवशी पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी ब्रह्मपुरीतील पिकनिक पॉइंटवर अशी गर्दी उसळली होती.
>विभाग पाऊस (मिमी)
कोकण १,८७६
मध्य महाराष्ट्र ३०४
मराठवाडा २६४
विदर्भ ४३२

Web Title: The state received more rainfall than the average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे