कला, शारीरिक शिक्षकपदांना राज्य सरकारची कात्री
By Admin | Updated: October 12, 2015 01:16 IST2015-10-12T01:16:00+5:302015-10-12T01:16:00+5:30
राज्याच्या शिक्षण विभागाने कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात कला

कला, शारीरिक शिक्षकपदांना राज्य सरकारची कात्री
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्यानुभव या तीन विषयांसाठी अंशकालीन व कंत्राटी पद्धतीने पदे निर्माण केली जाणार आहेत, मात्र, शासनाच्या या निर्णयाचा शिक्षण क्षेत्रातून निषेध नोंदविली जात असून, शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षक पूर्णवेळ काम करत आहेत. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कला, क्रीडा, आरोग्य आणि कार्यानुभव या विषयांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची
नियुक्ती केली जाईल, असा अध्यादेश नुकताच शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशावर चर्चा करण्यासाठी रविवारी आगाशे महाविद्यालयात शिक्षणक्षेत्रात काम करत असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, राज्यस्तरीय शिक्षण संस्था संघटनेचे सरचिटणीस हनुमंत भोसले, अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. नयना निमकर, आगाशे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या माधुरी वाघचौरे यांच्यासह सुमारे २00 हून अधिक शिक्षक बैठकीस उपस्थित होते.
दरम्यान, शासन निर्णयामुळे कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या तीन विषयांसाठी प्रत्येक शिक्षकाला आठवड्यासाठी एकूण १२ तासिका आणि एका वर्षासाठी १७६ तासिका वाट्याला येणार आहेत. राज्यातील एकूण १ हजार ८३५ शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही नियुक्ती करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात याबाबत अध्यादेशात विस्तृत नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)