राज्य नाट्य स्पर्धेकडे ओढा वाढतोय
By Admin | Updated: November 16, 2016 02:20 IST2016-11-16T02:20:31+5:302016-11-16T02:20:31+5:30
राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांनी रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले. मधल्या काळात नाट्य स्पर्धांमध्ये काहीशी

राज्य नाट्य स्पर्धेकडे ओढा वाढतोय
प्रज्ञा केळकर-सिंग / पुणे
राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांनी रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले. मधल्या काळात नाट्य स्पर्धांमध्ये काहीशी उदासीनता निर्माण झाली होती. मात्र, सद्य:स्थितीत भरघोस प्रतिसाद मिळत असून, या स्पर्धेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. यंदा राज्य नाट्य स्पर्धेचे ५६वे वर्ष असून पुणे विभागात एकूण ९५ संघ सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्राला मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमी हे जीवनानुभव देणारे, बहुश्रुत करणारे माध्यम आहे. मराठी संस्कृतीचे लेणे असलेल्या रंगभूमीने अनेक दिग्गज कलावंत घडवले. या कलावंतांच्या जडणघडणीत नाट्य स्पर्धांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्त्वविकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा उद्देश ठेवून शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांना गेल्या काही वर्षांमध्ये मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातही राज्य नाट्य स्पर्धांमधून रंगभूमीला दर्जेदार कलावंत मिळतील, अशी आशा आहे.
राज्यातील एकूण १९ केंद्रांवर तसेच दिल्ली व गोवा या केंद्रांसह नोव्हेंबर महिन्यात राज्य नाट्य स्पर्धांच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होते. यंदाही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य नाट्य स्पर्धांचा पडदा उघडला असून, विविध केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. पुणे विभागात २०१६-१७ या वर्षी ९५ संघांनी सहभाग घेतला आहे. २०१५-२०१६ या वर्षात सहभागी झालेल्या संघांची संख्या ८१ होती.
राज्य नाट्य स्पर्धेतून कलावंतांना अनुभवाची आणि संस्कारांची शिदोरी नेता यावी, या दृष्टीने स्पर्धेचे परीक्षक आणि सहभागी संस्था यांच्यातील संवादाचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. अंतिम हौशी नाट्य स्पर्धेत प्रथम बक्षीस ३ लाख, द्वितीय २ लाख तर तृतीय क्रमांकाला १ लाखाचे बक्षीस शासनातर्फे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५ लाख, द्वितीय ३ लाख तर तृतीय क्रमांकाला २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.(प्रतिनिधी)