रुग्णालये तपासण्याची राज्यात धडक मोहीम

By Admin | Updated: March 15, 2017 03:28 IST2017-03-15T03:28:56+5:302017-03-15T03:28:56+5:30

आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दि. १५ मार्च ते दि. १५ एप्रिल या कालावधीत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे

In the state of checking the hospitals, the campaign | रुग्णालये तपासण्याची राज्यात धडक मोहीम

रुग्णालये तपासण्याची राज्यात धडक मोहीम

पुणे : आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दि. १५ मार्च ते दि. १५ एप्रिल या कालावधीत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्यास किंवा आरोग्यविषयक विविध कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संंबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
राज्यात अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्यविषयक विविध कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे यापूर्वी अनेकदा आढळून आले आहे. मान्यता नसतानाही गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जातात. विविध सेवा पुरविताना अनेक डॉक्टरकडून गैरप्रकार होत असल्याचेही समोर आले आहे. पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुढील महिनाभर राज्यातील सर्व प्रकारच्या रुग्णालयांची तपासणी करण्याची मोहीम राबविली जाणार आहे.
या मोहिमेत शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णालयांवरही नजर असेल. आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व संबंधितांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
मोहिमेसाठी सर्व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची समिती स्थापन केली जाणार आहे. महापालिका क्षेत्र, महापालिका वगळून इतर शहरी भाग आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र समित्या केल्या जाणार आहेत. या समित्यांसाठी रुग्णालय तपासणीसाठी नमुना निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार रुग्णालयांची माहिती घेऊन संबंधित समित्यांना दररोज जिल्हास्तरावरील समितीला अहवाल सादर करावा लागणार आहे. रुग्णालयांमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.

Web Title: In the state of checking the hospitals, the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.