घरगुती कामाच्या व्यवसायाला सुरुवात मात्र अर्थचक्राला गती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:44+5:302020-12-04T04:30:44+5:30
पुणे : रंगकाम, सुतार काम, प्लंबर, इंटेरियर डिझायनिंग, इलेक्ट्रिशियन अशा घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कामाला सुरुवात झाली. मात्र अर्थचक्राला ...

घरगुती कामाच्या व्यवसायाला सुरुवात मात्र अर्थचक्राला गती नाही
पुणे : रंगकाम, सुतार काम, प्लंबर, इंटेरियर डिझायनिंग, इलेक्ट्रिशियन अशा घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कामाला सुरुवात झाली. मात्र अर्थचक्राला अजूनही गती नाही. असे घरगुती काम करणाऱ्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे घरोघरी जाऊन काम करणाऱ्या लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. संचारबंदीत सरकारने शिथिलता आणण्यास सुरुवात केली. परंतु लोकांच्या मनातील भीती कमी झाली नाही. अशा वेळी लोक घरातील गरजेची कामे स्वतः करू लागले. त्यामुळे घरोघरी जाऊन काम करणाऱ्या लोकांना स्वतःच्या व्यवसायाबाबत चिंता वाटू लागली. सद्यस्थितीत यांना कामे मिळू लागली आहेत. कामे मिळाली तरी व्यवसायाला चालना मिळायला वेळ लागेल. असेही त्यांनी सांगितले.
...............................................................
संचारबंदीच्या अगोदर घरोघरी कामे मिळत होती. त्या तुलनेत अनलॉकच्या प्रोसेसनंतर ३० टक्के कामे मिळत आहेत. मागच्या महिन्यापासून इलेक्ट्रिकची कामे मिळू लागली. लोक गरजेच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठीच घरी बोलावतात. पुढच्या महिन्यापासून जास्त काम मिळण्याची शक्यता आहे.
प्रतीक निंबाळकर
इलेक्ट्रिशन
.................
कोरोनामुळे आठ महिने काम बंद होते. मागच्या आठवड्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. घरात खिडकीची काच बसवायला गेल्यावर माझ्याकडून खबरदारी घेतली जाते. कामाच्या वेळेत घरातील लोकांना तासभर बाहेर जाण्यास सांगतो. एका आठवड्यात पाच घरातील काच बसवण्याची कामे केली आहेत.
अनिल शिंदे
मार्च महिण्यात बंद झालेले रंगकाम दिवाळीपासून चालू झाले आहे. लोकांच्या मनातील ५० टक्के भीती गेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कामाचा लोडही कमी झाला आहे. खबरदारी कारागीर आणि घरातील व्यक्ती या दोघांनाही घ्यावी लागते. आम्ही कारागिरांचीही काळजी घेत आहोत. कामाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाते. पोटापाण्यासाठी हे कारागीर मनापासून काम करतात.
अतुल चाचुर्डे
रंगकाम कंत्राटदार
...........................
घरोघरी इंटेरियर डिझायनिंगच्या कामाला यंदा अजूनही गती मिळाली नाही. दिवाळीच्या दिवसातला लोकांचा प्रतिसादही दिसून आला नाही. सप्टेंबरनंतर घरातील काम मिळण्यास सुरुवात झाली. कारागिरांची कमतरता भासत होती. आता हळूहळू ते मिळू लागले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती सुधारण्यास अजून एक महिन्याचा कालावधी लागेल.
प्रथमेश केसकर
इंटेरियर डिझायनर
......................
घरातील सुतार कामांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो दुकाने आणि कंपन्यांची कामे घेतो. मागच्या महिण्यात घरातील पाच कामे केली होती. आमच्याकडून सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच काम केले जाते.
महेश सणस
सुतार कारागीर
.............
पंधरा दिवसापासून घरोघरी जाऊन प्लंबिंगचे काम करत आहे. जवळपास सहा, सात महिन्यांनी कामाला सुरुवात झाली आहे. आता कुठंतरी आमची आर्थिक अडचण दूर होण्यास सुरुवात झाली आहे.
इंद्रजित सावंत
प्लंबर