रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात
By Admin | Updated: November 9, 2015 01:29 IST2015-11-09T01:29:32+5:302015-11-09T01:29:32+5:30
मंचर-शिरूर रस्त्यावर हिंगेवस्तीनजीक ओढ्यावर ५० लाख रुपये खर्च करून नव्याने पूल बांधण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदाराने पुलाच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी एक महिन्यापासून खडी आणून टाकली.

रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात
अवसरी : मंचर-शिरूर रस्त्यावर हिंगेवस्तीनजीक ओढ्यावर ५० लाख रुपये खर्च करून नव्याने पूल बांधण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदाराने पुलाच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी एक महिन्यापासून खडी आणून टाकली. अद्याप खडीकरण डांबरीकरण केले नाही, असे वृत्त चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने शनिवारी सकाळी वरील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण केल्याने वाहनचालकांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
मंचर-शिरूर रस्त्यावर हिंगेवस्तीनजीक एक अरुंद व जागेवरच चढ असलेला जुना पूल होता. त्यामुळे उसाचे ट्रक, साखरेचे ट्रक, तरकारी मालाचे टेम्पो, दुधाचे टँकर, उसाच्या बैलगाड्या जात असताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असे. त्यामुळे अवसरी बुद्रुक येथील स्थानिक ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या रस्त्यावरील नवीन पूल घेण्यासाठी मागणी केली होती.
मागणीनुसार दिलीप वळसे पाटील यांनी हिंगेवस्ती येथील नवीन पुलासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सहा महिन्यांपूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले; मात्र संबंधित ठेकेदाराने नवीन पुलाच्या परिसराचे खडीकरण, डांबरीकरण तसेच ठेवल्याने या रस्यावरून जाताना-येताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. (वार्ताहर)