ढोल पथकांच्या तयारीला सुरुवात
By Admin | Updated: July 10, 2015 02:02 IST2015-07-10T02:02:46+5:302015-07-10T02:02:46+5:30
गणरायाच्या आगमनाला बराच अवधी असला, तरी गणरायाच्या स्वागत मिरवणुकांत मोठ्या दिमाखात सहभागी होणाऱ्या ढोल पथकांच्या तयारीला उपनगरांत सुरुवात झाली आहे.

ढोल पथकांच्या तयारीला सुरुवात
कोथरूड : गणरायाच्या आगमनाला बराच अवधी असला, तरी गणरायाच्या स्वागत मिरवणुकांत मोठ्या दिमाखात सहभागी होणाऱ्या ढोल पथकांच्या तयारीला उपनगरांत सुरुवात झाली आहे.
रात्री १० नंतर मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर ढोल पथकाला मागणी वाढली आहे. सुरुवातीला फक्त नदीपात्रातच घुमणारा ढोल- ताशांचा आवाज उपनगरांमध्येही घुमू लागला आहे.
कोथरूड, कर्वेनगर अन् वारजे भागामध्ये सध्या ढोल पथकांची जोरदार तयारी सुरू असून, सध्या पथकांच्या आयोजकांची जागा अन् वादकांची शोध मोहीम सुरू आहे, तर काही पथकांच्या सरावालाही सुरुवात करण्यात आली असून कोथरूड भागात ढोलचे आवाज कानी पडू लागले आहेत.
सुरुवातीला फक्त छंद म्हणून सुरू झालेला हा ढोल पथकांचा प्रयोग सध्या स्पर्धात्मक रूपाकडे वाटचाल करत आहे. अनुभवी पथकातील सभासदासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली आहे. पुणे शहर, मुंबईसह अन्य भागातील मिरवणुकांमध्येही ढोल वाजवण्याची संधी मिळत असल्याने अनेक संस्थांनी व्यावसायिक कामे करण्यास सुरुवात केली आहे. मानाच्या गणपतीच्या समोर वाजवण्याची संधी मिळवण्यासाठी जुन्या सीडी अन् सरावाच्या चित्रीकरणाचाही वापर सुरू झाल्याचे आयोजक सांगत आहेत.
(वार्ताहर)
ढोल पथकांची राजाश्रयाकडे वाटचाल
पुण्यातील ढोल पथक म्हणजे, समविचारी लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेला प्रयोग, अशी ओळख असलेले ढोल लेझीम पथक सध्या राजाश्रयाकडे वाटचाल करत आहे. सर्वच राजकीय पक्षांना संपर्क वाढवण्यासाठी ढोल पथक माध्यम योग्य वाटत आहे. सध्याच्या व्यावसायिक अन् स्पर्धात्मक काळात तरुणांना एकत्र करून ढोल पथक सुरु करण्यापेक्षा, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून साहित्य जमा करून सराव करण्याकडे अनेक पथकांचा कल वाढला आहे.