वादग्रस्त साबण खरेदीचा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी स्थायीकडे

By Admin | Updated: January 10, 2015 00:39 IST2015-01-10T00:39:02+5:302015-01-10T00:39:02+5:30

महापालिकेच्या सेवकासांठी लाखो रुपयांची जादा दराने लाईफबॉय खरेदी बारगळल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने म्हैसूर कार्बोलिक साबण खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

Standing time for re-approval of the controversial soap purchase proposal | वादग्रस्त साबण खरेदीचा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी स्थायीकडे

वादग्रस्त साबण खरेदीचा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी स्थायीकडे

पुणे : महापालिकेच्या सेवकासांठी लाखो रुपयांची जादा दराने लाईफबॉय खरेदी बारगळल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने म्हैसूर कार्बोलिक साबण खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. परंतु, प्रशासनाकडून पुन्हा जादा दराने आलेल्या निविदेनुसार साबण खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी ३ लाख ९६ हजार साबणांची खरेदी करण्यात येणार आहे. जुनी खरेदी वादग्रस्त ठरल्यानंतर प्रशासनाने साबण खरेदीसाठी नव्याने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये म्हैसूर कार्बोलिक साबणाच्या एका नगाची किंमत १९ रुपये ३० पैसे देण्यात आली. ही सर्वात कमी किमतीची निविदा असल्याने त्यानुसार ३ लाख ९६ हजार साबण खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात आॅनलाइन खरेदीमध्ये म्हैसूर कार्बोलिकच्या साबणाची किंमत १६ रुपये ६५ पैसे दाखविण्यात आली आहे. आॅनलाइन खरेदीमध्ये जर साबण २ रुपये ६५ पैशांनी स्वस्त मिळत असेल तर लाखो साबण खरेदीची आॅर्डर देणाऱ्या पालिकेला तो १९ रुपयाला कसा मिळतो आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
म्हैसूर कार्बोलिक साबणासाठी ७७ लाख ६१ हजार रुपये तर व्हील साबण व व्हील पावडरसाठी ८४ हजार ७६९ रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
स्थायी समितीच्या पुढील
बैठकीमध्ये यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
मागील वेळेसच साबण खरेदी वादात सापडली होती. या पार्श्वभूमीवर त्याच्या दरांची तपासणी करूनच प्रशासनाने साबण खरेदीचा प्रस्ताव ठेवणे अपेक्षित असताना, पुन्हा जादा दरानेच खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर स्थायी समितीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)

साबण खरेदीचे गौडबंगाल काय?
४महापालिकेने ४ लाख साबणांच्या नगांची खरेदीची निविदा काढली असताना, बाजारभावापेक्षा कमी दराने साबण मिळणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात बाजारभावापेक्षा जास्त दर कसा?
४या साबण खरेदीमागचे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुन्हा-पुन्हा तीच चूक
महापालिकेच्या भांडार कार्यालयाकडून साबणाची खरेदी करण्यात येणार आहे. खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी बाजारमूल्याचे परीक्षण करण्यासाठी पालिकेची खरेदी सल्लागार समिती आहे. कोणत्याही निविदेचा प्रस्ताव ठेवताना बाजारमूल्याचा अभ्यास या समितीने करणे अपेक्षित असते. इंटरनेटवर आॅनलाइन किमती पाहण्यासाठी उपलब्ध असतानाही जादा दराने खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून कसा ठेवला जात आहे, याबाबत प्रश्न उभा राहिला आहे.

Web Title: Standing time for re-approval of the controversial soap purchase proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.