अतिक्रमण हटवताना दगडफेक

By Admin | Updated: January 13, 2016 03:46 IST2016-01-13T03:46:37+5:302016-01-13T03:46:37+5:30

येथील गाडीतळ परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईचे नेतृत्व करीत असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलिसांना अतिक्रमणधारकांनी काठ्यांनी व सिमेंटचे ब्लॉक व दगड फेकून

Stacking on deletion of encroachment | अतिक्रमण हटवताना दगडफेक

अतिक्रमण हटवताना दगडफेक

येरवडा : येथील गाडीतळ परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईचे नेतृत्व करीत असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलिसांना अतिक्रमणधारकांनी काठ्यांनी व सिमेंटचे ब्लॉक व दगड फेकून मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि. १२) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. त्यानंतर पालिका आयुक्तांनी स्वत: कारवाईचा मोर्चा सांभाळून गाडीतळ, गुंजन चौक व नगर रस्ता परिसरात ‘न भूतो न भविष्यति’ अशी मोठी कारवाई करून अतिक्रमणे हटवली. दरम्यान, अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न, दंगल, सरकारी कामात अडथळा आदी गुन्हे दाखल करून त्यांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका सहायक आयुक्त संध्या गागरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी सातपासून येरवडा परिसरात कारवाई सुरू होती. या कारवाईचा मोर्चा गुंजन चौकाच्या कोपऱ्यावर असलेल्या अतिक्रमणाकडे वळाला, त्या वेळी लालू हसन शेख, मौला हसन शेख व इम्रान मौला शेख हे अतिक्रमणधारक व त्यांच्या इतर १०-१२ साथीदारांनी अचानक कारवाई करीत असलेल्या पथकावर हल्ला चढविला. या जमावाने राजेंद्र जगताप, माधव जगताप व संध्या गागरे यांच्यासह इतर कर्मचारी व पोलिसांना काठ्यांसह हातापायांनी मारहाण केली. तसेच रस्त्याच्या कडेला पदपथाच्या कामासाठी ठेवलेले सिमेंट ब्लॉक, विटा, दगड असे दिसेल ते फेकून मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांसह सर्वांचीच धांदल उडाली. या घटनेत राजेंद्र जगताप व संध्या गागरे यांनाही किरकोळ दुखापत झाली. तर, माधव जगताप यांना चेहऱ्यावर व हाताला गंभीर जखम झाल्याने तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे कारवाईच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, येरवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. लागलीच लालू शेख, मौला शेख व इम्रान शेख या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महापालिका व पोलिसांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याने तसेच ही कारवाई पाहण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी, पोलीस बंदोबस्त या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.

आयुक्तांनी अतिरिक्त कुमक मागवून पूर्ण केली कारवाई
घटनेनंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. लगेचच अतिरिक्त कुमक मागवून काही काळ थांबविण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत सकाळी साडेअकराच्या सुमारास पुन्हा सुरू करण्यात आली. लालू शेख व त्याच्या कुटुंबीयांनी केलेले सरकारी जागेवरील हॉटेलचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेले भलेमोठे लोखंडी होर्डिंगही गॅसकटरच्या साह्याने पाडण्यात आले. दरम्यानच्या काळात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, ओमप्रकाश बकोरिया, सर्व विभागप्रमुख, १५ क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी व पालिकेचे इतर कर्मचारी तसेच १२ जेसीबी, मालवाहतूक करणारे टेम्पो आदी कुमक घटनास्थळी दाखल झाली.

दुकानदारांनी कारवाईला केला विरोध
अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतर गुंजन चौकालगत स्मशानभूमीच्या दोन्ही बाजूंकडील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात कारवाई करुन जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी पाडण्यात आलेल्या दुकानांच्या मालकांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप केला. ‘आम्हाला दुकानातील सामानही बाहेर काढू देता अथवा कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता पोलीस बळाचा वापर करून दंडेलशाही पद्धतीने ही कारवाई करण्यात आली,’ अशा भावना काही दुकानदारांनी व्यक्त केल्या.

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी माधव जगताप यांनी फिर्याद दिली असून, घटनेतील आरोपी असलेले शेख कुटुंब व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामकाजात अडथळा आणून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल भडकवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेख कुटुंबातील तिघांना अटक केली असून उर्वरिीा आरोपींनाही तत्काळ अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले. खडकी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे यांनीही कारवाईदरम्यान उपस्थित राहून पोलिसांना सूचना दिल्या.

Web Title: Stacking on deletion of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.