एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे
By Admin | Updated: March 23, 2016 00:59 IST2016-03-23T00:59:06+5:302016-03-23T00:59:06+5:30
होळी, धूलिवंदनामुळे सलग पाच दिवसांची शासकीय सुटी आल्याने सणांसाठी गावाकडे निघालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी खासगी वाहतुकीच्या जाळयात अडकत आहेत

एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे
पुणे : होळी, धूलिवंदनामुळे सलग पाच दिवसांची शासकीय सुटी आल्याने सणांसाठी गावाकडे निघालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी खासगी वाहतुकीच्या जाळयात अडकत आहेत. दोन दिवसांपासून स्थानकांत प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन खासगी वाहतूकदारांचे एजंट थेट स्थानकाच्या आतमध्ये येऊन प्रवासी पळवून घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रवासी पळविण्याच्या घटना वाढत असल्याची गंभीर दखल घेऊन काही महिन्यांपूर्वीच उच्च न्यायालयानेच एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहतुकीला मज्जाव करण्याच्या सूचना वाहतूक पोलीस, एसटी प्रशासन तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिलेल्या असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे लोकमतने स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच शिवाजीनगर बस स्थानक येथे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार समोर दिसत असतानाही केवळ कारवाईचा कोणताही अधिकार नसल्याने एसटीचे कर्मचारी हतबलपणे हा प्रकार पाहत असल्याचेही या पाहणीत दिसून आले.
> न्यायालयाच्या आदेशाचे काय ?
२ महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशानंतरही या वाहनांना बंदी घालण्यासाठी कोणत्याही यंत्रणेने पावले उचलली नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार, एसटी प्रशासनाकडून स्थानकांच्या परिसरातील अशा प्रवासी वाहनांचे क्रमांक तसेच गाडीची माहिती एकत्र करून दररोज स्थानिक पोलीस ठाणे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यादीसह पाठविली जात आहे. मात्र, त्यानंतर त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली किंवा नाही, याची माहिती ना पोलिसांकडे आहे, ना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे. त्यामुळे या दोन्ही विभागांना न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यास वेळ नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
> प्रवेशद्वारालाच एजंटांचा विळखा
एसटीच्या प्रमुख तिन्ही बस स्थानकांच्या प्रवेशद्वाराजवळच हे एजंट प्रवाशांच्या शोधात असल्याचे दिसून आले. एसटी स्थानकात ज्या ठिकाणी प्रवासी आत येतात, त्या ठिकाणी गराडा घालून एजंट प्रवाशांना आधी कुठे जायचे, याची विचारणा करताता. जर प्रवाशाने प्रतिसाद दिला नाही, तर स्वत:च बस जाणाऱ्या गावांची नावे जोरजोरात पुकारतात. तसेच, ‘दोनच जागा शिल्लक, अवघ्या काही तासांतच पोहोचविणार तसेच संबंधित गावाला जाण्यासाठी अवघे काही तिकिटाची रक्कम कमी करण्याचे आश्वासन’ही ते देतात. तर, काही एजंट चक्क बस थांबणाऱ्या फालटाच्या ठिकाणी जाऊनच प्रवाशांना खासगी बसने जाण्याची गळ घालताना दिसले. स्वारगेटहून कोल्हापूरला जाणाऱ्या एका बसमध्ये चक्क एक एजंट ‘बसला सुटण्यास अर्धा तास आहे, तर खासगी बस १० मिनिटांत सुटणार असून अवघ्या दोन ते तीन जागा आहेत,’ असे सांगून एका तरुण प्रवाशाला बसमधून खाली उतरवून घेऊन जाताना दिसून आला.