स्त्रियांच्या शरीरावर विकृतांच्या ‘स्पाय कॅमेऱ्या’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:38+5:302021-07-15T04:09:38+5:30

अतुल चिंचली पुणे: “क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा चाहिए जो किसी को नजर नाही आएगा? जिसका लाईव्ह विडिओ केवल ...

Spy cameras look at women's bodies | स्त्रियांच्या शरीरावर विकृतांच्या ‘स्पाय कॅमेऱ्या’ची नजर

स्त्रियांच्या शरीरावर विकृतांच्या ‘स्पाय कॅमेऱ्या’ची नजर

अतुल चिंचली

पुणे: “क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा चाहिए जो किसी को नजर नाही आएगा? जिसका लाईव्ह विडिओ केवल आपही कहीसे भी मोबाईल पे देख पायेंगे...’ असे संदेश पाठवून ‘स्पाय कॅमेऱ्या’चे ऑनलाईन मार्केटिंग जोरात चालू आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात किंवा ऑनलाइन मागणी करुन असे स्पाय कॅमेरे विविध कारणांसाठी बसवले जात आहेत.

या छुप्या (स्पाय) कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याचेही गुन्हे उघडकीस येत आहेत. विशेषत: स्त्रियांचे गुप्त चित्रण करण्यासाठी शयनकक्ष, स्नानगृहे, स्वच्छतागृहे तसेच मॉल, कपड्यांच्या दुकानातील कपडे बदलण्याच्या कक्षात स्पाय कॅमेरे बसवल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. महिलांचे गुप्त चित्रण करण्यामागे गुन्हेगारी प्रवृत्ती प्रामुख्याने आहे. मात्र वापरकर्त्यांच्या विकृत वृत्तीचा दोष तंत्रज्ञानाला कसा द्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘लोकमत’ने या बद्दल चौकशी केली असता सुरक्षिततेसाठी असे छुपे कॅमेरे सर्रास बसवले जात असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: किमती सामानाची दुकाने, गोदाम, आर्थिक व्यवहाराची ठिकाणे आदी ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांचा वापर कर्मचाऱ्यांवर तसेच संभाव्य चोरीच्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी केला जातो. त्याचवेळी या तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तीही आहेत, असे छुप्या कॅमेऱ्यांची विक्री करणाऱ्यांनी सांगितले.

मात्र कोणता ग्राहक कोणत्या कारणासाठी छुप्या कॅमेऱ्याची खरेदी करत आहे हे तपासणारी यंत्रणा असू शकत नाही. शिवाय हे कॅमेरे ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र या कॅमेऱ्यांचा वापर गुन्हेगारीसाठी, विकृतीसाठी केल्याचे उघड होत असेल तर संबंधितांना कडक शिक्षा करणे हाच उपाय असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

पुण्यात विद्यार्थिनी, नोकरदार महिलांची संख्या खूप मोठी आहे. वसतिगृहे, सदनिका, पेईंग गेस्ट आदी स्वरुपात त्यांचा पुण्यात मुक्काम असतो. अशा ठिकाणी छुपे कॅमेरे बसवले जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणीही असे कॅमेरे बसवले जात असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थिनी यांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

घड्याळ, पर्स, बुटातही छुपे कॅमेरे

पेन, घड्याळ, टोपी, पर्स, किचन, बाटलीचे झाकण, कुंडी, फोटो फ्रेम, बूट, शोकेस साहित्य, टेबल घड्याळ, बेल्ट अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये बसवलेले छुपे कॅमेरे उपलब्ध होत आहेत. या सर्व वस्तूंमध्ये असे कॅमेरे बसवूनही दिले जातात. शहरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत असे कॅमेरे सद्यस्थितीत मिळत आहेत. हे ‘स्पाय कॅमेरे’ पंधराशे रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे. ‘स्पाय कॅमेरा’ खरेदीसाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने विक्रेत्याला फोन केला असता, त्याच्याकडून तातडीने मोबाईलवर कॅमेऱ्याचे फोटो, माहिती, किंमत पाठवण्यात आली.

चौकट

‘ब्लॅकमेलिंग’साठी शरीरावर नजर

शयनकक्षातील असणाऱ्या घड्याळ, चार्जर, शोकेसच्या वस्तू, पाण्याची बाटली, किचेन अडकवण्याचा स्टॅन्ड, खोलीतला बल्ब आदी ठिकाणी स्पाय कॅमेरे लावता येतो. तो सहजी कोणाच्या निदर्शनासही येत नाही. नुकत्याच उघडकीस आलेल्या महिला डॉक्टरच्या शयनकक्ष आणि स्नानगृहातील छुप्या कॅमेऱ्याच्या घटनेनंतर याबद्दलचे गांभीर्य वाढले आहे. खासगी अवस्थेतील स्त्रियांच्या शरीराचे चित्रीकरण करून ‘हे चित्रीकरण सार्वजनिक करेन’, ‘घरच्या लोकांना दाखवेन,’ अशा धमक्या देऊन त्यांचे आर्थिक किंवा लैंगिक शोषण केले जात असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.

चौकट

“तंत्रज्ञानाशी निगडित वस्तूंवर बंधने आणता येणार नाहीत. स्पाय कॅमेरे बाजारात खुलेआम मिळतात. त्यांचा वापर चांगल्या किंवा वाईटासाठी करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. डिजिटलची दुनिया खूप मोठी आहे. त्याचा वापर कसा करावा याबद्दल जनजागृती गरजेची आहे. एखाद्या खोलीत स्पाय कॅमेरा लावणे हा गुन्हाच आहे. त्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊन असा गुन्हा केल्यास मोठी शिक्षा भोगावी लागते हे समजले तर लोक या मार्गावर जाणार नाहीत. कळाले. स्पाय कॅमेऱ्यासारखे अनेक गुन्हे पोलिसांसमोरही येत नाहीत. अनेकजण भीतीपोटी सर्व काही लपवून ठेवतात. त्यामुळे अशी गुन्हेगारी अजून फोफावते आहे.”

-दीपक शिकारपूर, तंत्रज्ञानतज्ज्ञ

Web Title: Spy cameras look at women's bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.