महिला डॉक्टरच्या स्नानगृहात, झोपण्याच्या खोलीत ‘स्पाय कॅमेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST2021-07-09T04:08:47+5:302021-07-09T04:08:47+5:30
पुणे/ धनकवडी : शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या स्टॉफ क्वॉर्टरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...

महिला डॉक्टरच्या स्नानगृहात, झोपण्याच्या खोलीत ‘स्पाय कॅमेरा’
पुणे/ धनकवडी : शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या स्टॉफ क्वॉर्टरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा कॅमेरा बाथरूम आणि बेडरूममध्ये लावण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ३१ वर्षीय महिला डॉक्टर एका नामांकित महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या स्टाफ क्वॉर्टर्समध्ये आणखी एका महिला डॉक्टरसह राहते. त्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुग्णालयात असतात. या महिला डॉक्टर मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर खोलीवर परतल्या. त्यावेळी स्नानगृहाचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला असता तो लागला नाही. झोपण्याच्या खोलीतील दिवाही लागला नाही. त्यामुळे त्यांनी वीज तंत्रज्ञाला बोलावले. त्याने दुरुस्तीसाठी बल्बचा होल्डर उघडला असता त्यात स्पाय कॅमेरा, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. झोपण्याच्या खोलीतही असाच प्रकार आढळून आला.
यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करता सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समजले. तसेच रखवालदारानेही येथे दुसरे कोणी आले नसल्याचे सांगितले. हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान घडला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.