क्रीडानिकेतनच्या बिलांचा ‘खेळ’खंडोबा
By Admin | Updated: January 6, 2015 00:04 IST2015-01-06T00:04:06+5:302015-01-06T00:04:06+5:30
महापालिकेच्या दिरंगाईचा मोठा फटका क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

क्रीडानिकेतनच्या बिलांचा ‘खेळ’खंडोबा
दीपक जाधव ल्ल पुणे
महापालिकेच्या दिरंगाईचा मोठा फटका क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणारे रिक्षाचालक व इतरांची बिलेच ८ महिन्यांपासून काढण्यात आलेली नाहीत. सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणे रिक्षा व स्कूलबस चालकांनी बंद केल्याने विद्यार्थ्यांना मोठी वणवण करून शाळा गाठावी लागत आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या विद्यानिकेतन शाळांच्या धर्तीवर ३ क्रीडानिकेतन शहरामध्ये सुरू करण्यात आल्या. दत्तवाडी येथे सर्वांत पहिली क्रीडानिकेतन २००९ मध्ये सुरू झाली त्यानंतर आता हडपसर व येरवडा येथे क्रीडानिकेतनची सुरुवात झाली आहे. विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याने अनेक चांगले खेळाडू या शाळांमधून तयार होत आहेत. तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन काही निवडक विद्यार्थ्यांना क्रीडानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ही शाळा भरते. शहराच्या कानाकोपऱ्यातून या शाळांमध्ये विद्यार्थी येतात. त्यात सकाळच्या व्यायाम व इतर प्रशिक्षणासाठी त्यांना लवकर यावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी रिक्षा व व्हॅनची विशेष व्यवस्था केली आहे.
शिक्षणमंडळाकडून महापालिकेकडे आर्थिक व्यवहार हस्तांतरित झाल्यानंतर क्रीडानिकेतन शाळांची बिले निघण्यात मोठी अडचण येत आहे. बिल काढण्यासाठी पालिकेच्या सर्व किचकट प्रक्रिया पार पाडाव्या लागत असल्याने बिले निघण्यास ८-८ महिने उशीर होत आहे. हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांना इतके दिवस विनापैसे काम करणे शक्य होत नाही.
क्रीडानिकेतनचे रिक्षा व
व्हॅनचालक यांची बिले लवकर मंजूर व्हावीत, त्याचा शाळांवर परिणाम होऊ नये याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेचे संगणक व समुपदेशक शिक्षक यांचीही बिले वेळेवर निघण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- बाबा धुमाळ, शिक्षण मंडळ अध्यक्ष
क्रीडानिकेतनच्या शाळांची बिले काढण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल झाल्याने ती निघण्यास उशीर होत आहे. आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असून, एक-दोन दिवसांत त्याची बिले काढली जातील.
- बी. के. दहिफळे, शिक्षणप्रमुख
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये क्रीडानिकेतनचे यश
गेल्या ६ वर्षांपासून दत्तवाडी येथील खाशाबा जाधव क्रीडानिकेतनमध्ये महापालिका शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये क्रीडानिकेतनचे विद्यार्थी यश मिळवित आहेत. खेळांमध्ये मिळालेल्या पारितोषिकांनी मुख्याध्यापकांचे कार्यालय भरले आहे. खेळाच्या प्रशिक्षणांबरोबरच तिथे त्यांना दररोज शास्त्रोक्त पद्धतीने पोषक आहार दिला जातो. सकाळी नाष्टा व दुपारी जेवण महापालिकेकडूनच दिले जाते. क्रीडानिकेतनची वाटचाल अशीच सुरू राहण्यासाठी महापालिकेकडून भक्कम पाठबळ मिळण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.