आध्यामिक गुरू रघुनाथ येमूल यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:09+5:302021-07-12T04:09:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर तुझी ही बायको ...

Spiritual guru Raghunath Yemul arrested | आध्यामिक गुरू रघुनाथ येमूल यांना अटक

आध्यामिक गुरू रघुनाथ येमूल यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार, मंत्रीही होणार नाही, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे,’ असे सांगून प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरू यांना अटक केली आहे.

रघुनाथ राजाराम येमूल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, बाणेर) असे या आध्यात्मिक गुरूचे नाव आहे. रघुनाथ येमूल यांचे शेकडो भक्त असून, त्यामुळे पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागिरथी पाटील, राजू अंकुश अशा ८ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी या डिसेंबर २०१९ मध्ये रात्री आपल्या बाळासह बेडरूममध्ये झोपल्या असताना त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तेथे सोनाली व दीपक गवारे हे बेडरूमच्या बाहेर हळदी-कुंकू लावलेल्या टाचण्या मारलेला लिंबू एका पिशवीमध्ये ठेवताना त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. त्यानंतर गणेश याने फिर्यादी यांना सांगितले की, रघुनाथ येमूल हे माझे गुरू आहेत व त्यांनी तू अवदसा असून, पांढऱ्या पायगुणाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान दूषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगाही तिच्याकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पीडा कायमची निघून जाईल. त्यामुळे गणेश येमूल यांनी दिलेले लिंबू फिर्यादीवरून उतरवून टाकले. याची माहिती मिळाल्यावर चतु:श्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येमूल यांना अटक केली.

Web Title: Spiritual guru Raghunath Yemul arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.