शीतपेय पळविण्यासाठी झुंबड
By Admin | Updated: March 22, 2016 01:28 IST2016-03-22T01:28:42+5:302016-03-22T01:28:42+5:30
देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (देहूरोड) येथील भुयारी मार्गावरील पुलाच्या कठड्याला सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शीतपेयांची मालमोटारभरधाव वेगात धडकल्याने अपघात झाला

शीतपेय पळविण्यासाठी झुंबड
देहूरोड : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (देहूरोड) येथील भुयारी मार्गावरील पुलाच्या कठड्याला सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शीतपेयांची मालमोटारभरधाव वेगात धडकल्याने अपघात झाला. अपघातात मालमोटारीचे मोठे नुकसान झाले असून, मोटारीतील शीतपेयांच्या बाटल्या पुलाखालील मुख्य रस्त्यावर पडल्याने महामार्ग व भुयारी मार्गातील रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अपघातानंतर परिसरातील रहिवाशांची शीतपेयांच्या बाटल्या पळवून नेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
मुंबईकडून पुण्याकडे शीतपेयांच्या बाटल्या घेऊन जाणारी मालमोटार (एमएच ०४ एएल ३६८४) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्याजवळ शितळानगर येथील भुयारी मार्गावरील पुलाच्या कठड्याला जोरात धडकून अडकली. सुदैवाने पुलावरून पडली नाही अन्यथा मोठा अपघात घडला असता. अपघातानंतर संबंधित मालमोटारीचा चालक फरार झाल्याचे देहूरोड पोलिसांनी सांगितले. अपघात झाल्यांनतर शीतपेयांची मालमोटार धडकून शीतपेये रस्त्यावर पसरल्याने व मालमोटारीत उघड्यावर पडल्याचे दिसल्याने परिसरातील रहिवाशांची शीतपेये पळविण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. पोलिसांनी भुयारी मार्गातील रस्त्यातील बाटल्या
बाजूला करून एका बाजूने वाहतूक सुरळीत करून दिली. महामार्गावरील पुलावर अपघाताच्या ठिकाणी
पोलीस तैनात करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वार्ताहर)